सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘राम राम गंगाराम’ या चित्रपटांची नाव घेतली की आपल्याला आठवतात विनोदवीर दादा कोंडके.दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा खंडेराव कोंडके होते. गिरणी कामगाराच्या पोटी त्यांचा जन्म
८ ऑगस्ट, इ.स. १९३२ रोजी
भोर,पुणे येथे गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी झाला. म्हणून या पुत्ररत्नाचे कृष्णा नाव ठेवण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या.पुढे चालून
ते प्रसिध्द अभिनेते व चित्रपट-निर्माते झाले. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील बहारदार संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या.मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती.दादांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत वादग्रस्त राहिलं आहे. त्यांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केले होते आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटले होते की दादा आणि तिने कधीही लग्न केले नव्हते.
मोठा भाऊ या नात्यांने सिनेसृष्टी आणि चाहते त्यांना दादा म्हणूनच हाक मारायचे. यामुळे त्यांनीही सिनेमांमध्ये त्यांचं नाव दादा कोंडकेच लावायला सुरुवात केली.
“तांबडी माती” हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. ‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले.
सत्तरच्या दशकामध्ये मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने लौकिक प्राप्त करून दिला तो दादा कोंडके यांनी! दादा कोंडके हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे रिअल हिरो होते. त्यांच्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले त्यांचे मनोरंजन केले.आपल्या पॅन्टची नाडी दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दादांनी प्रेक्षकांच्या पसंतीची नाडी परफेक्ट ओळखली होती. त्यामुळे दादांचे सिनेमे हे अफाट गाजत होते.दादा कोंडके अभिनयाबरोबर ते गीतकार देखिल होते,अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान,काय ग सखु,चल र शिरपा देवाची किरपा,झाल्या तिन्हि सांजा,माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग ऊभी?,हिल हिल पोरी हिला.ही त्यांची प्रचंड गाजलेली गाणी,आजही रसिकश्रोते अगदि डोक्यावर घेतात.दादा एक माणूस म्हणून खुप दिलदार होते.तसेच ते एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस होते.त्यांचे चित्रपट आले की भल्याभल्या निर्मात्यांनाही धडकी भरायची एवढी त्यांच्या अभिनयात धमक होती.
त्यांनी मराठी सिनेसृष्टीला जे सिनेमे दिले आहे ते कधीच जुने होणार नाहीत.खर तर,आजच्या पिढीला दादा कोंडके हा अविष्कार कदाचित माहीतही नसेल परंतु एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात दादांच्या सिनेमांनी मोठा हंगामा केला होता.आज त्यांचा जन्मदिवस,अभिनयाचा बादशाहा अष्टपैलूव्यक्तीमत्व असलेले दादा कोंडके आज आपल्यात जीवंत नसले तरी त्यांच्या अभिनयाव्दारे ते कायम आपल्यात हृदयात जीवंत आहेत!!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१