नवी दिल्ली, दि. ८ ऑगस्ट २०२३:
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत नियोजित ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीबाबत यावेळी चर्चा झाली.
खरगे यांच्या संसद भवनातील कार्यालयात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, माजी मंत्री नसीम खान, खा. अनिल देसाई देखील उपस्थित होते. मुंबईत नियोजित ‘इंडिया’ बैठकीच्या नियोजन समितीत काँग्रेस पक्षाने समन्वयक म्हणून अशोक चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या भेटीची माहिती देताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांना मुंबईतील बैठकीच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली. नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर खरगे यांनीही काही सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. पाटणा व बंगळुरू येथे यापूर्वी ‘इंडिया’च्या बैठकी झाल्या असून, मुंबईतील बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी संयुक्तपणे स्वीकारली आहे.