सुनिता पंदनवड यांना पुन्हा सरपंच पद बहाल …! औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

 

 विशेष प्रतिनिधी ; ( राजेश्वर कांबळे )
—————–
तालुक्यातील बोरी खु ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांचे सरपंच पद औरंगाबाद येथील अपर विभागीय आयुक्त यांनी रद्द केले होते. सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांनी स्वतःच्या घरासमोरील रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या निर्णयाविरोधात सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा औरंगाबाद खंडपीठाने अपर विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांनी दिलेला सरपंच अपात्रतेचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे सौ. सुनिता पंदनवड यांना पुन्हा सरपंच पद बहाल केले आहे.

कंधार तालुक्यातील मौजे बोरी खु ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांनी स्वतःच्या घरासमोरील रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ज-३) नुसार ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून चालु राहण्यास अपात्र ठरविण्यात यावे, असा अर्ज गंगाधर सटवाजी मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. गंगाधर मुंडे यांच्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. तसेस गटविकास अधिकारी यांचा या अतिक्रमण बाबतीत चौकशी अहवाल मागवून घेतला. त्यानंतर कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांचे पती रामकृष्ण पंदनवड यांच्या नावे असलेल्या घरासमोरील रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण केले नाही, असा निर्णय दिला. यानंतर गंगाधर मुंडे यांनी औरंगाबाद येथील अपर विभागीय आयुक्त यांच्याकडे नाराजीने अपील दाखल करून सौ.सुनिता पंदनवड यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी केली. या अपीलवर अपर विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांनी सुनावणी घेतली. तसेच ५ जुलै रोजी निर्णय देताना जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बदलून सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांना ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून चालु राहण्यास उर्वरीत कालावधीसाठी अनर्ह ठवले होते.
दरम्यान, बोरी खु ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्र.८९५६/२३ दाखल करुन औरंगाबाद येथील अपर विभागीय आयुक्ताच्या ५ जुलै रोजीच्या ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून चालु राहण्यास उर्वरीत कालावधीसाठी अनर्ह ठरविणाऱ्या आदेशाला आव्हान दिले होते. यावर औरंगाबाद खंडपीठाने याचिकामध्ये बुधवारी दि.९ आॅगस्ट रोजी सुनावणी घेऊन रिट याचिका क्लाॅसेक प्रमाणे मंजूर केली. तसेच सरपंच पदावरून अनर्ह ठरविणारा अपर विभागीय आयुक्ताचा ५ जुलैचा आदेश रद्द ठरविला आहे. त्यामुळे सुनिता पंदनवड यांना पुन्हा सरपंच पद बहाल केले आहे.

चौकट

सरपंच पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम रद्द

सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांचे सरपंच पद अपर विभागीय आयुक्तांनी रद्द केले होते. त्यामुळे तहसील कार्यालयाने बोरी खु ग्रामपंचायतीच्या सरपंच/उपसरपंच पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी दि.४ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. त्यानुसार गुरुवारी दि.१० आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता बोरी खु ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच/उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडणार होती. मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे तहसीलदार राम बोरगांवकर यांनी तात्काळ निवडणूक कार्यक्रम रद्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *