ट्रीटमेंटची गरज नक्की कोणाला ?

माझ्या एका वाचकाचा ( लेडी ) फोन होता तिचा सख्खा धाकटा भाऊ वय वर्षे २५ आणि त्याची बायको ही त्याच्याच सख्या मामाची मुलगी वयवर्षे २३ . जिला खरं तर लग्नच करायचं नव्हतं .. या दोघांच्या लग्नाला १४ महीने झाले आहेत आणि आताही ते दोघे व्हर्जीन आहेत.. कारण तिने लग्नाच्या वेळीच सांगितले होते की वर्षभर आपण फक्त मित्र राहु..
माझ्या वाचकसखीच्या बोलण्यातुन असं जाणवलं की त्या मुलीने तिला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आधीच क्लीअर केल्या होत्या .. तिला येणारी सेक्सची किळस किवा ते नको वाटणं ,किवा लहानपणापासूनच तिला कोणाशेजारी झोपायला आवडत नव्हतं त्यामुळे आताही कोणी हात लावलेला आवडत नाही वगेरे…. तरीही लग्नानंतर त्यांना हनीमूनला पाठवलं तेही ठिक आहे कारण तिथे ते एकमेकांना जाणुन घेउ शकतात पण तिथुन काहीही न करता परत आल्यावर घरच्यानी शांत राहायला हवं होतं तिच्या मानसिकतेचा विचार करायला हवा होता .. हे न करता तिचं कॉलेज बंद केलं, फोन तिच्या सासूबाईकडे असतो म्हणजे ती बाहेर काही करत असेल का यासाठी असावं..मला हे सगळच विचित्र आणि चुकीचं वाटलं..
पहिल्या सहा महिन्यात त्यांनी देवाचं पाहिलं मग तिला गायनॅक कडे नेलं आणि आता तिच्यावर सेक्सॉलॉजीस्टची ट्रीटमेंट सुरु आहे.. आणि माझ्या वाचक सखीचं म्हणणं आहे की तिने मला भेटावं आणि माझ्याशी बोलुन मी तिला योग्य मार्गदर्शन करु शकते.. पण मी तिला म्हटलं , तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला हे ठिक आहे पण यावर मी काय बोलु ?? कारण सेक्सॉलॉजीस्ट माझ्यापेक्षा उत्तमच सांगतील..
अर्थात तिच्या माहेरची मला परिस्थिती माहीत नाही ,तिच्या माहेरी यावर काय चर्चा झाली हे माहीत नाही.. तिच्या मानसिकतेचा कोणी विचार करतय का माहीत नाही
लहानपणी तिच्या मनावर कुठल्या पुरुषाकडुन आघात झालाय का हेही माहीत नाही.. मला फक्त एकच बाजु कळली .. नात्यात लग्न .. दिसायला सुंदर.. वागायला छान बोलायला छान , उत्तम स्वयंपाक करते.. घरी आलेल्याची काळजी घेते , तिचं बाहेर कुठेही अफेअर नाही हे सगळं घरचे सांगतात त्यामुळे डिवोर्स घ्यायचा नाही पण तिला मुल व्हावं ही घरच्यांची अपेक्षा..
मला कळत नाही मुल त्यांना हवं असेल तर ते पहातील.. संसार त्यांचा आहे त्यांना निर्णय घेउदेत. त्यांना वेळ द्यायला हवा असं मला वाटतं.
.घरातील मोट्यानी यात किती ढवढवळ करावी हेही समजायला हवं.. यावरुन एक समजतं की आजही स्त्री मुल देण्यासाठीच आहे , तिला स्वतंत्र मतं नाहीत.. तिला पाहिजे तो निर्णय ती घेउ शकत नाही.. आणि तिचीच सासु किवा नणंद म्हणजेच हे स्त्री बोलतेय हे तर त्याहूनही वाईट.. खरं तर ट्रीटमेंटची गरज तिला नाही तर कुटुंबाला आहे.. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत प्रगती होवुच शकत नाही आणि यात घरातील वडीलधाऱ्या पुरुषांनी सुध्दा लक्ष घालुन यावर चर्चा करुन तिचं स्वातंत्र्य हिरावुन न घेता तिला वेळ देउन , तिच्यावर विश्वास ठेवुन , समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करुन , आणि ती आपली सुन नसुन मुलगी आहे असं समजुन , पेशंस ठेवुन वागणं योग्य आहे..
लैगिकता आणि शिक्षण आणि त्यातुन येणारा शहाणपण किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा यातुन सिध्द होतं…
व्यक्त व्हा. .. अव्यक्त राहु नका..


सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *