विद्यार्थी हा महाविद्यालयाचा श्वास असतो -प्राचार्य डॉ. हरिदास राठोड

मुखेड- विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेताना ज्ञानग्रहणाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. कनिष्ठ महाविद्यालयापेक्षा वरिष्ठ महाविद्यालयात तुम्हाला विविध कलागुणात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी असते.केवळ परीक्षेपुरते शिक्षणाकडे पाहू नका. एका हातात गुणपत्रिका व दुसऱ्या हातात पदवी घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडण्या ऐवजी सर्व गुणसंपन्न बनुन बाहेर पडा. महाविद्यालयात विविध उपक्रम चालविले जातात त्याचा पुरेपूर फायदा घ्या.त्यासाठी महाविद्यालयात नियमित उपस्थित रहा.आपले महाविद्यालय हे निसर्गरम्य वातावरणात सर्व सोयींनी युक्त असे आहे.

 

परवाच महाविद्यालयाला नॅकचा ए ग्रेड प्राप्त झालेला आहे.येथील प्राध्यापक गुणवंत आहेत त्यांना गरिबीची जाणीव आहे.संस्था व मी तसेच माझे सहकारी सदैव तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतोत. संस्थेचे संस्थापक सचिव कै.आ. गोविंदरावजी राठोड साहेब व संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड व विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड साहेब यांनी आपल्याला चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून भव्य क्रीडांगण, उत्तम ग्रंथालय, वसतीगृह व्यवस्था, संगणक सुविधा व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

त्याचा फायदा घ्या. राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग यासारख्या अभ्यासेत्तर व्यक्तिमत्व विकास घडवण्या-या उपक्रमात सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.आम्ही मागील पाच वर्षात अनेक उपक्रम घेतले, संस्थेने उत्तम भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे आपण ए ग्रेड प्राप्त करू शकलो आहोत.त्यामुळे आपली आता जास्तीची जबाबदारी वाढली आहे. महाविद्यालयात शिस्तीला महत्त्व द्या, ओळखपत्र नेहमी सोबत बाळगा,गणवेश वापरत चला, मोठ्यांचा आदर करा. महाविद्यालय लागलीच स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करत आहे. त्याचा फायदा घ्या. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही सर्वजण काम करत असतोत कारण विद्यार्थी हा महाविद्यालयाचा श्वास असतो असे प्रतिपादन ग्रामीण ( कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथील प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांनी प्रस्तुत महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेशीत झालेल्या विद्यार्थ्यांसमोर अभिभाषण प्रसंगी बोलताना केले.

 

सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास समितीकडून आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या समितीचे प्रमुख प्रा.डाॅ. श्रीनिवास पवार यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समितीच्या सदस्या प्रा.डाॅ.कविता लोहाळे यांनी केले तर आभार स्टाफ सेक्रेटरी प्रा.डाॅ. नागोराव आवडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांच्या हस्ते महाविद्यालयात अँटी रॅगिंग माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व सद्भावना शपथ देण्यात आली.नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनाही अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव कै. गोविंदराव राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर सत्कार समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.अरूणा ईटकापल्ले, कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.एन.यू.नाईक, विद्यार्थी विकास समिती सदस्य प्रा.डाॅ. महेश पेंटेवार,प्रा.डाॅ. सुभाष देठे,कार्यालयीन अधीक्षक रमेश गोकुळे महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचे सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *