कंधार : (प्रतिनिधी संतोष कांबळे )
जिल्ह्यात तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये जनवरांच्या लंपी या संसर्गजन्य आजारामुळे गाय वर्गीय जनावरे आजारी झाल्याचे निदर्शनास आले आहे. लंपी हा आजार विषाणूजन्य संसर्ग असल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक पशुपालकांनी आपल्या गायवर्गिय जनावरांना न चुकता लसीकरण करून घ्यावे, आजार पसरवणाऱ्या कीटकांचा नायनाट करावा व सदर आजाराची लक्षणे दिसताच पशुपालकांनी तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालय येथे संपर्क साधून आपल्या पशुधनावर वेळीच उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. भालके एस.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ.दिनेश रामपुरे यांनी केले आहे.
लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रसार बाह्य कीटक व परोपजीवी प्रामुख्याने डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड, गोमाशा व चिलटे तसेच बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारापाणी यापासून होतो. करिता जनावराच्या अंगावरील व गोठयातील या कीटकांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी कीटकनाशक औषधाने फवारणी करण्यात यावी. तसेच दहा मिली करंज तेल दहा मिली निम तेल दहा ग्राम अंगाचा साबण एक लिटर पाण्यामध्ये मिसळून हे द्रावण जनावराच्या अंगावर तसेच जनावराच्या गोठ्यामध्ये फवारता येईल. तसेच पशुपालकांनी आपली जनावरे इतर जनावरांमध्ये मिसळू देऊ नये व शक्यतो बाहेरची जनावरे आपल्याकडे आणू नये.
सदरच्या रोगाची लक्षणे अशी, जनावरांच्या अंगावर १० ते २० मि.मी. व्यासाच्या गाठी येणे, सुरुवातीस भरपूर ताप येणे, डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव, चारा पाणी खाने बंद होणे, दूध कमी देणे, काही जनावरांच्या पायावर सूज येणे व लंगडने अशी लक्षणे दिसतात. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार जनावरांची तपासणी करणे व उपचार करावा.
तसेच या आजाराची लस ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी लंपी आजाराचे लसीकरण करण्यात येत आहे, ज्या पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस दिली नसेल अशा पशुपालकांनी आपल्या जनावरांना लंपी आजाराची लस देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.भालके एस. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ.दिनेश रामपुरे यांनी केले आहे.