रेशनच्या दुकानात ऊभे राहुन मिळालेली साखर भिजली म्हणुन पावसाला शिव्या घालणारे नाना…..शेवटी चडफडत तसेच भिजकी पिशवी सांभाळत चालत चालत घरी आलेले….आता नानी यावरुन वाद घालणार या विचाराने ते अजुनच तिरसटलेले…तिला चांगलेच खमके ऊत्तर द्यायचे..,”पाऊस काय माझ्या बापाच्या मालकीचा नाहीये..मी म्हणेल तेव्हा यायला व जायला….”
आता नानीचे अजिबात ऐकुन घ्यायचे नाही..पाऊस आला व साखर भिजली यात आपला काय दोष? नानीने आयुष्यभर आपल्याला कारणाकारणाने कायम सुनावले…पण आता बास….
असा विचार करीत घरी आलेले नाना…दारात चपला काढुन आत जातात न जातात तोच नानी लगबगीने पुढे आल्या…हातातली पिशवी घेतली..ती भिजलिये हे त्यांच्या लक्षात आले. सुक्ष्म सुस्कारा त्यांनी सोडलेला नानांना जाणवला….
नानीने आत जाऊन पिशवी आत ठेवुन आधी नानांना हातपाय धुऊन कपडे बदलायला सांगीतले…टाॅवेलने डोके चांगले कोरडे करायला सांगीतले…गरमागरम आले घातलेला चहा करुन आणला…..
नानांना ना हे जरा आश्चर्यचकीत करणारेच होते….
चहा प्याल्यावर नानींनी मुलाचे आलेले पत्र नांनाच्या हातात दिले…..लांब शहरात असणार्या मुलाची नोकरी आता तिथेच पक्की झाली होती…त्याने परस्पर लग्न ऊरकुन घेतले होते..व तिकडेच स्थायिक होण्याचा त्याचा निर्णय त्याने पत्राद्वारे कळवले होते…..
पत्र वाचता वाचता नानांच्या डोळ्यात पाणी जमा झालेले…..काबाडकष्ट करुन या मुलाला शिकवले व आज त्याने म्हातारपणात आपला हात सोडला हे दुःख त्यांच्या डोळ्यातुन बाहेरच्या पावसाप्रमाणेच बरसु लागले…
पण नानींचा हात त्यांच्या खांद्यावर त्यांना जाणवला..”नका वाईट वाटुन घेऊ हो….मी असं काही होणार हे आधीच ओळखलं होत…आपण दोघ आहोत ना एकमेकांना शेवटपर्यंत….तेच महत्वाचे….नका काळजी करु…मी आहे ना!”….
नानींचे आश्वासक शब्द ,स्पर्श, नानांना जाणवले…..
नानींच्या या शब्दांनी काय किमया झाली कुणास ठाऊक पण खिडकीतुन दिसणारा पाऊस आता त्यांना चिडचिडायला लावत नव्हता तर आल्हाददायक वाटला…
तेवढाच आल्हाददायक जेवढा तो नानांच्या व
नानींच्या लग्नाच्या दिवशी बरसताना होता….संस्कारी व सोबतीचा विश्वास देणारा…
नानांना च्या मनातले मळभ कुठेतरी पळुन गेलेले…व नानींचा हा समजुतदार पैलु पाहुन त्यांच्या मनातही दिलाशाचे इंद्रधनुष्य उमलुन आलेले होते……..
हो पाऊस असाही असतो…सोबतीचा अतुट विश्वास परत बरसवणारा…दिलासादायक…
पडणारा पाऊस सारखा असला तरी त्यात प्रत्येकाचे भिजणं असं वेगळ असू शकतं.
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211