कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या येथील प्रसिद्ध सोफी संत हजरत सय्यद शाह शेख अली सांगडे सुलतान मुष्कीले आसान यांचा ५८९ वा उर्स शनिवार दि .२६ ऑगस्ट रोजी पासून धुमधडाक्यात सुरू झाला. उरसानिमित काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत विविध जाती धर्मातील हजारो भाविक भक्तांनी सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले.
कंधार शहर साधु संताचे शहर म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही प्रसिद्ध आहे. शहराला साधू संतांचा वारसा आहे. या साधू संतांच्या पालख्या, उर्स, महोत्सवात विविध जाती धर्माचे भक्त श्रद्धा भावनेने सहभागी होतात. हजरत सांगडे सुलतान यांच्या उरसालाही विविध जाती धर्मातील भक्त श्रद्धा सुमन अर्पित करतात. २०२३ यावर्षी उरसाला हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली. सांगडे सुलतान यांचा दर्गा जाज्वल्य देवस्थान म्हणून मराठवाड्यासह पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
साडेपाच वाजता फतेहाखानी नंतर दर्गा मधून सज्जादा सय्यद शाह अनवारूल्लाह हुसैनी राफाई कादरी यांच्या नेतृत्वाखाली संदल मिवणुकीस प्रारंभ करण्यात आला. शहरातून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली.
यावेळी विविध जाती-धर्मातील भाविकांनी संदलच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली हाती. हजरत सांगडे सुलतान यांच्यावर श्रद्धा ठेवणारे भाविक प्रत्येक धर्मात आहेत. जिल्ह्यासह विविध प्रांतात आहेत. उरसानिमित हे सर्व भविक कंधारला येतात व दर्गाचे दर्शन घेऊन संदल मिरवणुकीत सहभागी होतात. ही मिरवणूक शहरातील मुख्यमार्गावरून मार्गक्रमण करीत रात्री उशिरा दर्गात पोहचली.
शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, शिवराज धोंडगे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, अड. दिगंबर गायकवाड, मधुकर पाटील डांगे, सुनील कांबळे, नितीन पाटील, सचिन पाटील, रमाकांत जोगदंड, निलेश गौर, कतरु बंडेवार, योगेश जाधव यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजरत सांगडे सुलतान यांच्या दर्ग्यात उपस्थिती लावून दर्शन घेतले.