नांदेड –
कोविड काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्ञानदानाचे कार्य शिक्षक करत आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक्स अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम हॅण्डलवरून राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. समाजातील सर्व घटकांनी सोशल मीडियाद्वारे ही मोहीम राबविण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले होते. सोशल मीडियावर व्यक्त होणे गावकऱ्यांना सहसा शक्य नसते. त्यामुळे जवळा देशमुख येथील ग्रामस्थांनी शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक ढवळे जी.एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत प्रत्यक्षात थँक्स अ टीचर! हा उपक्रम राबविला.
कोविड १९ च्या काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षक विविध उपक्रम, माध्यमे यांच्या साहाय्याने शिक्षक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हाटसप, दीक्षा अॅप, दूरदर्शनवरील टिलीमिली कार्यक्रम पाहण्याचे आवाहन शिक्षक करीत आहेत. तसेच ज्यांना आॅनलाईन पद्धतीने शिकणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी गृहभेटी तथा स्वाध्यायपुस्तिकांची स्वखर्चाने निर्मिती करुन दूरस्थ शिक्षण पद्धतीने समुह अध्यापन व मार्गदर्शन करीत आहेत. या त्यांच्या कार्याबद्दल शाळेतील शिक्षकांना धन्यवाद देण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीला शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांना पुष्प प्रदान करुन शब्दरुपी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सरपंच ग्यानोबा टिमके, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, आनंद गोडबोले, हैदर मामू, मारोती चक्रधर, दीपक जाधव, विठ्ठल तोटकूलवार यांची उपस्थिती होती.