आयुष्यातील खूप वर्षे मी शिक्षण-क्षेत्रात घालवली आणि ज्ञानदानाचे पवित्र काम ही करत आहे. पूर्वी एक म्हण होती – ‘नाही मिळाली भीक, तर मास्तरकी शीक.’ मंडळी, मास्तरकी अशी टिंगल करण्यासारखी गोष्ट नाही. शिक्षक म्हणजे समाज घडविणारा एक घटक असतो. भावी पिढी, नागरिक घडविण्याची जबाबदारी असणारा शिक्षक असतो. पूर्वी आर्थिक लाभ होणारा हा व्यवसाय नव्हता.
खरे तर हा व्यवसाय नाहीच. हा एक पेशा आहे. हे एक व्रत आहे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्याचे सार्थक करणारा पेशा !
काही शिक्षक खरेच असे होऊन गेले. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची आठवण यासाठीच होते. शिक्षणक्षेत्रात भरीव कार्य करणारे ते मोठे तत्त्वज्ञ होते. तत्त्वचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा पैलू होता. हा आदर्श प्रत्येक शिक्षकाने ठेवला पाहिजे. _आज जेव्हा मी वर्तमानपत्रातून शिक्षणसंस्थांमधून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचते, तेव्हा मन दुःखी होते. खरे तर चारित्र्य शिक्षकाचा आचार असला पाहिजे. शिक्षण त्याचा स्वधर्म असला पाहिजे. विद्यार्थी त्याचे दैवत असले पाहिजेत. शाळा ही त्याचे मंदिर असले पाहिजे. धडपड ही त्याची पूजा हवी.
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही त्यांची प्रार्थना हवी आणि समाजाचा आशीर्वाद हाच त्याचा प्रसाद असावा. हे सारे आज घडते का?
विद्यार्थी आणि शिक्षक हे एक जिवंत, सळसळते नाते एकेकाळी अकृत्रिम जिव्हाळ्याने भरलेले असायचे. गुरुजींची छडीसुद्धा पाठीवर अत्तराप्रमाणे घमघमायची. शिक्षक संपूर्ण समर्पित वृत्तीने शिकवायचे; त्यामुळे शिक्षकाने केलेली शिक्षा त्याच्या पुढच्या प्रवासाची शिदोरी असायची. आज वाईट वाटते ते या गोष्टीचे की, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा करायची नाही. केल्यास, त्याचा खूप मोठा गाजावाजा. प्रसार माध्यमें याला विकृत रूप देणार नि शिक्षकाच्या प्रतिमेलाच काळिमा फासणार.
आज शिक्षकही ‘समर्पण’ हा शब्द विसरलेला दिसतो. आज समर्पणाचा इतिहास नि शिक्षणाचा भूगोल झालाय. शिक्षणाकडे केवळ एक व्यवसाय म्हणून बघितले, तर विद्यार्थी ग्राहक बनतील. उरेल फक्त रुक्ष व्यवहार.
आज समाजानेपण शिक्षकावर विश्वास ठेवायला हवा नि शिक्षकानेदेखील त्या विश्वासास पात्र असायला हवे. सर्वात जास्त आनंद देणारा हा व्यवसाय आहे. कारण, हा आनंद संपूर्ण जिवंत आणि रसरशीत असतो. शिक्षक व समाज यांच्यात सहजमैत्री फुलली पाहिजे. शिक्षकाने खूप अभ्यासू वृत्तीने, तळमळीने शिकविले पाहिजे. त्याच्याजवळ ज्ञानाची भली मोठी शिदोरी हवी, म्हणजे विद्यार्थी घंटेची वाट पाहणार नाहीत. शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ वाटली पाहिजे. एकतर्फी आदर काय कामाचा?
शिक्षकाने विद्यार्थ्यांवर प्रेम केले, तरच विद्यार्थी शिक्षकाचा आदर करतील. आज मात्र वाईट वाटते. दोघेही एकमेकांवर प्रेमही करत नाहीत, की आदरही करत नाहीत. पण मला मात्र याचा अनुभव उत्तम आहे. आज आमचे माजी विद्यार्थी भेटतात, तेव्हा ते प्रेमाने चौकशी करतात; आदराने वागतात. तेव्हा खरे तर खूप बरे वाटते. अंत:करण भरून येते. विविध प्रकारचे उत्तम काम करणारे विद्यार्थी भेटतात, आणि तेव्हा अभिमानाने उर भरून येतो. शालेय जीवनातच उत्तम शिक्षण मिळाले तर विद्यार्थी उत्तम नागरिक बनतात. ताठ कण्याने समाजात वावरतात.
“The Eduation is backbone of the life.”
अशा ताठ कण्याचे विद्यार्थी पाहिले, की आयुष्य सार्थकी लागल्याची भावना निर्माण होते.
केवळ मानसशास्त्र शिकून मुलांचे मन कळत नाही, तर त्यासाठी त्यांच्या मनात स्थान मिळवावे लागते. मुले आहेत ती, कधीतरी शिस्त झुगारणाच. दप्तराचे ओझे वाहताना मुले कंटाळणारच. धुळीत कपडे मळले, चिखलाने खराब झाले, म्हणजे ‘बेशिस्त’ असे मी कधीच समजले नाही. थोड्या खोड्या, थोडे असत्य याचा कधीच बाऊ केला नाही. मला पूर्ण माहीत होते की, माणूस विद्यार्थीदशेत जे पाठ्यपुस्तकातील धडे शिकतो, ते तो सर्व विसरतो. तरीही जे शिल्लक राहते, ते शिक्षण असते. म्हणून अशा चुकामधून तो शिकतो नि हे प्रसंगच तो लक्षात ठेवतो. खूप यांत्रिक, खूप चौकटीतले नाही शिकवले मी. आजही ते शाळेतले अनुभव सुखावतात. या वयातही बळ देतात. कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.
जे वाटले, ते मनोगतातून मांडले.
Happy Teachers day.
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211