दहीहंडी आणि मराठी- हिंदी गाणी.

 

उंचच उंच बांधल्या जाणाऱ्या दहीहंडी, त्यासाठी ठेवण्यात येणारे भलेमोठे बक्षीस व त्या बक्षिसासाठी एकावर एक थर रचत हंडी फोडण्यासाठी सुरु असलेली गोविंदा पथकातील चढाओढ प्रेक्षकांना रोमांचक वाटते. यासोबतच गोविंदा पथके हिंदी आणि मराठी चित्रपटातील पुढील गाण्यांवर थिरकताना आपल्याला दिसतात.
“गोविंदा आला रे आला…जरा मटकी संभाल बृजबाला…” दहीहंडीवर चित्रित झालेली सगळी गाणी अशी ही चालीत म्हणायला लावणारी! ताल धरायला लावणारी! नुसती कानावर पडली की थिरकायला लावणारी. अशाच काही गाण्यांची उजळणी आज आपण करणार आहोत.
१९६३ साली प्रदर्शित झालेल्या “ब्लफमास्टर” या चित्रपटातील “गोविंदा आला रे आला “हे गाणं आजही प्रत्येकाच्या मनात एक वेगळ्या उंचीवर आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आणि शम्मी कपूर यांच्या वर चित्रित झालेलं हे गाणं दहीहंडीच्या दिवशी ऐकताना एक वेगळाच जोश संचारतो.
“हो कैसी निकली है झूम के ये टोली
आज खेलेगी दूध से ये होली…”
किती सुंदर शब्दरचना दुधाने होळी खेळणं ही कल्पनाच किती गोड आहे. या गाण्याचे अजरामर झालेले बोल राजेंद्र कृष्णन यांनी लिहीले होते.
१९८९ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटातील “गोविंदा रे गोपाला” हे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं आजही अव्वल स्थानावर आहे.
” खिडकीतल्या ताई अक्का अशा वाकू नका ,
पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका”
म्हणत लक्ष्याने “हमाल दे धमाल” चित्रपटातील या गाण्यात अक्षरशः धमाल उडवून दिली होती. आजही दहीहंडी खेळताना “ढाक्कूमाकूम…ढाक्कूमाकूम…. गोविंदा रे गोपाळा” हे बोल ऐकू आल्यावर लक्ष्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
” लाल लाल पागोटे गुलाबी शेला,चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा…” या ओळी असतील किंवा
“एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार” या ओळी. अशोक हांडे यांनी गायलेल्या या गाण्याने व लक्ष्याच्या नृत्याने लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठले होते.
दहीहंडी उत्सव हा आपल्याकडे एखाद्या खेळाप्रमाणे खेळला जातो. बरीच गोविंदा पथक यात सहभागी होतात. दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा असते, चढाओढ असते. हेच सगळं पडद्यावर दाखवणारी गाणं आठवतात.
“मोरया”चित्रपटातील संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं गाणं.
”गोविंदा रे गोपाळा…गोविंदा रे गोपाळा…
यशोदेच्या तान्ह्या बाळा… गोविंदा रे गोपाळा
आला रे आला, गोविंदा आला….
गवळणींच्या पोरींनो जरा मटकी संभाळा…”
दोन्ही गटातील दहीहंडीचा अटीतटीचा सामना पाहायला आणि ऐकायला छान वाटतो.
“कधी हातात हात, कधी पायात पाय,
अरे खांदयावर घेणार पण डोक्यावर न्हाय…”. असे हे सुंदर गाण्याचे बोल आहेत. दहीहंडी आमचीच टीम फोडणार अशी अशा बाळगून सगळेच नाचताना व गाताना दिसून येतात.
काळानुसार बदललेला गोविंदा सुद्धा आता डॅशिंग झालाय.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘वृंदावन’ या चित्रपटातील हे गाणं पूजा सावंत, राकेश बापट आणि वैदेही परशुरामी या तिघांवर चित्रित करण्यात आलं आहे.
“ताशांच्या आणि ढोलांच्या तालावर सजलेलं ,“आला रे आला डॅशिंग गोविंदा, चंगा है बंदा डॅशिंग डॅशिंग गोविंदा”
हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं असून याचं संगीत मात्र अमितराज यांनी दिलेलं आहे.
काळ बदलत गेला तरी काही गोष्टी अजिबात बदलल्या नाहीत. पूर्वीचा तरूण वर्ग दहीहंडी साठी जेवढा उत्साही असायचा तेवढाच आजचाही आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलं किंवा मनोरंजनाची साधनं आली तरी आजचा तरुण सुद्धा दहीहंडी दिवशी थरावर थर लावून गोपाळकाला खेळतोच. आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा मध्यंतरी “कान्हा” म्हणून एक मराठी चित्रपट आला होता.
आता नावंच ‘कान्हा’ म्हटल्यावर दहीहंडी वर चित्रित गाणं नाही, असं कसं होईल.? २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील “कृष्ण जन्मला” हे गाणं बरंच लोकप्रिय झालं.
“ढगांच्या आडून चंद्र हासला…
आकाशी ता-यांनी रास रंगला….
कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला…
कृष्ण जन्मला बाई कृष्ण जन्मला…”
वैभव तत्ववादी आणि गश्मीर महाजन याच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याचं संगीत अवधूत गुप्ते यांनी दिलं आहे. अवधूत गुप्ते, सोनू कक्कर आणि वैशाली सामंत यांनी गायलं आहे. आणि मंदार चोळकर यांच्या लेखणीतून हे सुंदर बोल असलेलं गाणं अवतरलेलं आहे.
श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण भारतभर, भारताबाहेर मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. दहीहंडी हा नुसता शब्द उच्चारला तरी उत्साहाला उधाण येतं. आणि हा उत्साह वाढवण्याचं काम करत असतात ती लाऊडस्पिकर वर वाजणारी गाणी.
“शोर मच गया शोर… देखो आया माखनचोर…” हे किशोर कुमार यांच्या आवाजातील गाणं तर हमखास लावलं जातं.“एक दो तीन चार, राजू दादा के चेले होशियार” अशी सुरुवात असलेल्या या गाण्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी याजेवढी धमाल केली आहे तेवढीच धमाल हे गाणं ऐकून आताचे गोविंदा दहीहंडी फोडताना करतात. १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘बदला’ या चित्रपटातील हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहीलं होतं आणि या आपलं भाग्य म्हणावं लागेल की या गाण्याला संगीत
लक्ष्मीकांत – प्यारेलाल यांचं मिळालं होतं.
हल्ली दहीहंडी दिवशी प्रत्येक शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडीचे थर लावून ती फोडली जाते. आणि जोडीला असतात मोठमोठ्या आवाजात वाजणारे डॉल्बी स्पीकर. याच स्पीकर वर अजून एक गाणं ऐकायला मिळतं ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचं ” मच गया शोर सारी नगरी रे, आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे”…
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या “खुद्दार” या चित्रपटातील अमिताभ यांच्या वर चित्रित झालेलं हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं. प्रत्येक गोविंदाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आजही लोकप्रिय आहे.
बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटांमधून दहीहंडी हा सण साजरा करताना आपण बघतो, त्यावर चित्रित झालेलं गाणं तर हमखास असतंच. “चाँदी की डाल पर सोने का मोर,सोने का मोर..
ताक झांक ताक करे नीचे का चोर” हे असंच एक गाणं. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या “हेलो ब्रदर ” या चित्रपटातील गाण्याला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. सलमान खानचा स्वतःचा चाहतावर्ग वाढत असताना हे गाणं आलं होतं. सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं खुद्द सलमान खान ने गायलं आहे. सोबत अलका यागनिक यांचा आवाज आहे. संगीत दिलं होतं हिमेश रेशमिया यांनी.
आज हम लोग मस्ती करेगा!असंच एक गाणं म्हणजे संजय दत्त याच्या “वास्तव” मधील गाणं. बरोबर ओळखलंत!
” हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर”
आज हम लोग मस्ती करेगा!”
हेच ते गाणं. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा….अशा मराठी शब्दांनी सुरूवात होणारं हे गाणं कोणाला माहीत नाही तर नवलच.
नव्वदच्या दशकातील मुंबई, आणि अंडरवर्ल्डचं पसरत चाललेलं साम्राज्य. असा तो काळ. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या “वास्तव” ने एक इतिहास घडवला होता. जतिन ललित यांचं संगीत असलेलं हे गाणं अतुल काळे आणि विनोद राठोड यांनी गायलं होतं. मराठी असो वा हिंदी. दहीहंडी वर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं लोकप्रिय झालं आहे. २०१२ साली आलेला “ओह माय गॉड” या चित्रपटातील “गो गो गोविंदा” हे गाणं सुद्धा असंच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ताल धरायला लावणारं. कारण मिका सिंग आणि श्रेया घोशाल यांनी गायलेल्या या गाण्यावर ताल धरलाय तो खुद्द प्रभू देवा याने. आता प्रभू देवा यांचा डान्स बघणं म्हणजे डोळ्यांना पर्वणी असते. या गाण्याने बेस्ट कोरिओग्राफी चे ॲवॉर्ड सुद्धा मिळवले होते. यापैकी तुमचं आवडीचं गाणं किंवा तुम्हाला सुचलेलं गाणं कोणतं ते मला नक्कीच प्रतिक्रियेमधून सांगा.
महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह व जल्लोष अवर्णनीय असतो.पण
भलेमोठे बक्षीस व त्या बक्षिसासाठी एकावर एक थर रचत हंडी फोडण्यासाठी सुरु असलेली गोविंदा पथकातील चढाओढ प्रेक्षकांना रोमांचक वाटत असली तरी हंडी फोडण्यासाठी शेवटच्या थरावर असलेल्या गोविंदाचा जीव धोक्यातच असतो.
याचे भान ठेवून हा उत्सव सर्व दक्षता घेऊनच साजरा करावा.
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

 

रूचिरा शेषराव, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *