…. एकीकडे गोकुळ..
…. दुसरीकडे धांगडधिंगा..
रोजच्याप्रमाणे काल संध्याकाळी टेकडीवर गेले होते.. काल जन्माष्टमी होती त्यामुळे नेहमीप्रमाणे मुंगळा मुंगळा या गाण्यावर ४ वाजल्यापासुनच धांगडधिंगा सुरु होता ..खरं तर भगवंताला त्या धांगडधिंग्याशी काहीही देणे घेणे नव्हते कारण तो बिझी होता गोकुळ सजवण्यात.. त्याला काळजी होती त्याच्या जनावरांची…त्याच्या भक्तांची..
टेकडी चढत असताना मोजुन १० एक जण वर जात होते म्हणजेच काय तर इतर मंडळी धांगडधिंगा पहायला गेली असावीत.. जी टेकडी चढुन वर गेली ती माझ्यासारखी नशीबवान होती कारण आम्हाला गोकुळ पहायला मिळालं होतं…टेकडीच्या वर तळ्यात बदकं पोहत होती .. आज उमलणाऱ्या कमळांच्या कळ्या आजच्या सूर्योदयाच्या प्रतिक्षेत होत्या..तिथुन पुढे गेले तर काही भुभु मस्ती मज्जा करत होते.. छान वारं सुटलं होतं.. वातावरण प्रफुल्लित होतं.. थोडं पुढे गेल्यावर काही म्हशी चरत होत्या .. हिरव्यागार गवताचा आस्वाद घेताना भगवंताचे आभार मानत असाव्यात..
डावीकडे ३-४ गाई चरताना दिसल्या सोबत त्यांची गोड वासरं होती.. त्यांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांत मला भगवंताचा भास होत होता.. चालता चालता माझी पावलं तिथेच थिरकली कारण मधेच एक गाय वासराला चाटत होती आणि त्याचक्षणी मला तिला हात लावायचा मोह आवरला नाही कारण गाईच्या पोटात ३३ कोट देव असतात म्हणजेच ३३ आजार बरे करण्याची ताकद गाईत असते. . श्रीकृष्णाला प्रिय अशी गाय जिला मला नमस्कार करता आला.. जणु काल जन्माष्टमी निमित्त मला भगव्न्तानेच दर्शन दिले असा तो क्षण होता.. मी त्या वाऱ्यावर सैरभैर झाले होते.. काय पाहु आणि काय नको असं झालं होतं.. निसर्गाचा फ्रेशनेस.. गाईच्या शेणाचा वास.. सगळं भरभरुन श्वासात घेत होते तितक्यात लक्ष गेलं ते ३-४ मेंढ्या आणि बकऱ्याच्या कळपाकडे आणि मी त्यांच्याकडे धावत सुटले.. दादा फोटो घेउ ना ? असं वाक्य माझ्या तोंडुन आलं आणि माझ्या कॅमेऱ्याने ते नयनरम्य दृश्य टिपायला सुरुवात केली..नुकतीच जन्मलेली , काही दोन दिवसापूर्वी जन्मलेली पिल्ले त्यांना पाहुन माझा आनंद गगनात मावेनासा झाला.. त्यांच्या आई चरायला गेल्या असल्याने ती दुधासाठी ओरडत होती तितक्यात मेंढ्या चरुन आल्या आणि पिल्ले आईच्या कुशीत गेली.. त्यांच्या आईला त्यांनी कसं ओळखलं असेल असा विचार करत भगवंताचे आभार मानत आणि निसर्गाच्या कलाकृतीबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करत मी हवेत हेलकावे घेत होते.. आईला फुटलेला पान्हा पाहिला आणि दुध लोणी चोरणारा कृष्ण आठवला.. कदाचित तोच दुध पित असावा असा भास झाला..
कालची संध्याकाळ काहीशी वेगळी होती .. भगवंत त्याच्या वेगवेगळ्या लिला दाखवत होता मी त्या लिला प्रत्यक्ष अनुभवत होते आणि मी मनात इतकच म्हटलं , कशाला हवेत करोडो रुपये .. यासारखं सुख माझ्यासारख्या भाग्यवंतालाच मिळु शकतं.. टेकडी रोजचीच पण आज काहीतरी वेगळं चैतन्य होतं जे फक्त आणि फक्त मलाच जाणवत होतं..
आनंद सोबत घेउन दोन मिनीटे झाडाखाली बसले आणि मनात खंत आली ती म्हणजे पाऊस नाही.. पाणी कमी.. ही हिरवळ संपली तर त्या पिल्लांना दुध कुठुन मिळेल?? आणि नकळत डोळे पाणावले.. तितक्यात मित्राचा फोन आला.. कुठे आहेस ग ??.. आलोच फोटो काढु.. पण खरच आपल्या या सणापायी आपण निसर्गाची हानी करत नाही ना याचं भान हवं.. दहीहंडी असो किवा गणपती , दिवाळी पाणी लाईट याची नासाडी होणार नाही याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.. आणि जो हा लेख वाचेल त्याने प्रत्येकाने भगवंताकडे पावसासाठी मागणी करा..मी मात्र या सगळ्या रुपात काल भगवंताला भेटले..आणि तुम्ही ??
हरे कृष्ण..
सोनल गोडबोले.. अभिनेत्री ,लेखिका