असा रंगारी श्रावण

 श्रावणातील विलोभनीय निसर्गामुळे माणूस सुखावतो,व मनोहर दृश्य पाहून मानवाच्या मनाला आनंद मिळतो
,जागोजागी निसर्गात चित्रांची रांग मांडली आहे. सर्वत्र पंगत बसलेली आहे, श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे, श्रावण पान फुलांचे पातळ नेसून थेंब ठसून सजवून बसला आहे. या महिन्यात भगवान शिवशंकर माता पार्वती आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते,हा महिना पावसाचा आहे. म्हणून समुद्रात पाण्याची पातळी वाढते,तेव्हा धोका होऊ नये, यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात,श्रावण महिन्यात कोणत्याही प्राण्यांना मारू नये व त्याचे मांस भक्षण करू नये, कारण या काळात वातावरणात बदल झालेला असतो,

 

या महिनात चंद्र श्रवण नक्षत्रात येत असल्यामुळे त्याला श्रावण महिना असे नाव पडले आहे. श्रावण महिना सर्व महिन्यांमध्ये धार्मिक सणासाठी अग्रेसर आहे. म्हणून श्रावण महिन्याला व्रत
वैकल्याचा महिना असे म्हणतात.

या महिन्यात लोक नवनवीन घराचे दुकानांचे पूजन करताना दिसतात पोथ्या- पुराणे वाचन करून त्यांचे पूजन केले जाते. सुख समाधानासाठी उपवास धरून सोडले जातात, आजही तिसऱ्या श्रावणी सोमवारला व शनिवारला अतिशय महत्त्व आहे. यावर्षी चार श्रावणी सोमवार आले आहेत.विशेषत:तिसरा सोमवारी लहान मुलापासून ते थोरापर्यंत उपवास धरले जातात. काही लोक तर पूर्ण एक महिन्याचा उपवास करून एकच वेळ भोजन करतात. अनेक ठिकाणी तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा भरते.

 

शाळेंना अर्धी सुट्टी दिली जाते.त्यामुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार होते हा महिना म्हणजे जणू काही निसर्ग हिरवा शालू परिधान करून बसला आहे. असा भास होतो, पाण्याच्या सरी अधून -मधून येत असतात.ऊन -पावसाचा लपंडाव चालूच असतो या महिन्यात मन प्रसन्न होते.

 

*”श्रावणमासी, हर्षमानसी*
*हिरवळ दाटे चोहीकडे*
*क्षणात येते सरसर शिरवे*
*क्षणात फिरूनी ऊन पडे* “
याच काळात पक्ष्यांचा राजा मोर आपला मनमोहक पिसारा फुलवून
आनंदी आनंद असतो, सप्तरंगी धनुष्य आकाशात एक वेगळा देखावा निर्माण करतो या महिन्यामध्ये भाविक भक्त महाराष्ट्रातील औंढा नागनाथ. परळी वैजनाथ .भीमाशंकर.त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर,या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन पुण्य पदरात पाडून घेतात. हे महाराष्ट्रातील महत्त्वाची ज्योतिर्लिंगे आहेत. याच महिन्यात नागपंचमी
,रक्षाबंधन, मंगळागौर, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, (दहीहंडी) आणि पिठोरी अमावस्येला पोळा हा सण येतो.

 

श्रावणी शुद्ध पंचमीस नागपंचमी सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवविवाहित सुवासिनी या दिवशी झोके खेळणे. फेर धरणे.झिम्मा,फुगडी ,टिप-या खेळणे,अशी नाना प्रकारचे खेळ वेगवेगळ्या भागात खेळले जातात. नागपंचमीला वारुळाला जाऊन नागाला दूध ,लाह्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करतात, पूजा करताना मराठमोळ्या पोशाखाचा आग्रह धरला जातो आणि महिला नऊवारी नेसून पूजा करतात
यानंतर भाऊ- बहिणीचे अतूट प्रेम असणारा रक्षाबंधन हा सण येतो आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार होते राणी कर्णवतीने हुमायूनला राखी बांधून तिने आपल्या पतीचे संरक्षण केले होते.एवढी शक्ती या रक्षाबंधना मध्ये असते,यानंतर श्रावण वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून द्वारका, गोकुळ वृंदावन ,मथुरा, काशी आणि सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातो
.कृष्णाची महिमा अपार आहे तो देवाचा देव आहे.

 

कंसाचा वध करून; कालिया मर्दन नागाला ठार मारले. पूतना मावशीलाही यमसदनी पाठविले. चुकीचे भविष्य सांगणा-या ज्योतिषाला ही पळून लावले.
गोवर्धन पर्वत करंगळीने उचलला. नरकासुराचा वध करून त्याच्या कैदेतून सोळा हजार महिलांना मुक्त केले.त्यामुळे सर्व मनुष्य जातीवर श्रीकृष्णाचा प्रभाव आहे हे वरील घटनातून दिसून येते. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो. श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी जंगलात गुरे राखताना शिदोरी सोडून एकमेकांना देऊन जाती पातीची बंधनं तोडून टाकतात ही शिकवण गोपाळकाल्यातून आपणास मिळते म्हणून हा काला भारतात सर्वत्र प्रसिद्ध आहे, अखंड हरिणाम सप्ताहमध्ये शेवटच्या दिवशी काला होतो,वारकरी संप्रदायात तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात.
दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सर्वत्र केला जातो या दहीहंडीतून उच्च ध्येयाकडे जाता येते ही शिकवण मिळते म्हणून दहीहंडी( दहीकाला) सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. गोविंदा आला रे! म्हणून घोषणा दिल्या जातात. गोविंदा कडून दहीहंडी फोडली जाते ही प्रथा भारतात सर्वत्र असून उत्तर भारतात ही जास्तीत जास्त आहे. मुंबई येथे सर्वात उंच दहीहंडी बांधून फोडली जाते. श्रावण महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत अनेक गावात चातुर्मासाचे भजन केले जाते या काळात मंदिरात जाऊन भाविक आनंदाने भजन, कीर्तन , प्रवचन,आराधना ऐकत बसतात
.वेगवेगळ्या मंदिरात, देवळात पोथी पुराणे वाचले जातात.

 

समूहाने ज्येष्ठ नागरिक- महिला त्यांचे श्रवण करतात म्हणूनच श्रावण महिना व्रत वैकल्याचा महिना म्हणूनच सर्वत्र ओळखला जातो. श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस तो म्हणजे बैलपोळा होय, शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजा- सर्जाचा सण म्हणजे बैलपोळा होय. भारतीय संस्कृतीत बैलपोळ्याला अतिशय महत्त्व दिले जाते.भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेती बैलाच्या साह्याने कसली जाते. त्यामुळे शेतीत माणिक- मोती पिकतात
.शेतकरी अतिशय आनंदाने बैलपोळा साजरा करतात ,मिरवणूक काढून वाद्य वाजवून आनंद व्यक्त करतात या दिवशी बैलाच्या मानेवर ज्यू ठेवला जात नाही .आजही ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील सर्व सणाचे महत्त्व टिकून आहे.

काळानुसार काही परंपरा बदलत आहेत .शहरांमध्ये बरेच जण मातीचे बैल घेऊन सण साजरा करताना दिसतात.सध्या ट्रॅक्टर मुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. या सणामुळे सर्व समाज एकत्र येऊन गावात ऐक्य निर्माण होण्यासही मदत होते हे निश्चित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात सर्वत्र आनंदी वातावरण पाहायला मिळते.
“रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण” त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावे, चांगल्या प्रथा पाळाव्यात, सर्वांना
पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

संकलन
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव
अध्यक्ष : विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, ता, मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *