कंधार ; प्रतिनिधी
कंधार आगारातील सर्व मार्गावर धावणाऱ्या बसेस आरक्षणामुळे दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दोन दिवसात आगारप्रमुख व सर्व कर्मचाऱ्यांनी कंधार बस स्थानकाचे रूपच बदलून टाकले.
कंधार येथील सकल मराठा बांधवांकडून कंधार बंद ची हाक देण्यात आली. त्यामुळे कंधार आगाराने ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन दिवस आगाराकडून बससेवा बंद ठेवण्यात आली होती, या दोन दिवसांतच सर्वच कर्मचारी आगारात होते.
आगार प्रमुखांनी या बदलाची कल्पना मांडली कर्मचाऱ्यांनीही होकार देऊन जमल त्या पद्धतीने वर्गणी देऊन बदल करायचे ठरवले अन् चक्क दोनच दिवसात बस स्थानकाचे रूपच बदलून टाकले,
बस स्थानकात रंगरंगोटी, शुशो- भीकरण, झाडे, बगीच्या, परिसर स्वच्छता, भिंतीवर चित्रकाम, प्रवाशांना
बसण्याची आसन व्यवस्था, गार्डन, एसटीचे महत्त्व सांगणारे चित्र इत्यादी दोन दिवसात कामे करून चक्क बस स्थानकाचे रूपच बदलून टाकले आहे.
त्यामुळे आलेला प्रवासी आश्चर्यचकित होत आहे. हे अचानक झाले कसे ? त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे आगारातील प्रशासकीय, चालक, वाहक, यांत्रिकी, कर्मचारी यांनी वर्गणी जमा करून हे काम केले आहे. त्यांचे हे कार्य करण्याची कल्पना ऐकून रंग घेऊन देण्याची प्रशासनाची मदत मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
प्रत्येक माणसाच्या अंगात काही ना काही सुप्तगुण असतात असेच सुप्त गुण असणारे कर्मचारी आगारांमध्ये पहावयास मिळाले चित्रकाराला लाजवेल असे चित्र येथील कर्मचाऱ्यांनी काढले आहेत. जाणाऱ्या व येणारे एसटीचे वेळापत्रक, अधिकारी कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक, गाडी मार्गाची नावे, झाडांचे महत्त्व, हिरकणी कक्ष, प्रवाशांची बैठकवस्था यांना सुद्धा ऑईल पेंट मारल्यामुळे बस स्थानक चकाचक दिसत आहे. प्रवाशांसाठी सेल्फी पॉईंट, मुख्य भागातून बस स्थानकात प्रवेश करताना बसचे चित्र सर्व प्रवाशांना आकर्षित करीत आहे, त्यामुळे प्रत्येक जण सेल्फी व फोटो काढत आहेत.