विश्वंभर चौधरी व अ‍ॅड्.सरोदे यांची शनिवारी शहरात सभा

नांदेड ; प्रतिनिधी

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सुजाण जनतेने भाजपला पराभूत करावे, या स्पष्ट उद्देशातून कार्यरत असलेल्या ‘निर्भय बनो’ चळवळीची २८वी सभा येत्या शनिवारी (दि.३०) शहरात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत डॉ.विश्वंभर चौधरी आणि अ‍ॅड्.असीम सरोदे यांचे भाषण होईल.

‘निर्भय बनो’च्या सभांना अलीकडे नागपूर, अमरावती, नवी मुंबई इत्यादी मोठ्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेडमधील वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक परिवर्तनवादी कार्यकर्ते वरील चळवळीशी जोडले गेले असून त्यांच्या पुढाकारातून निश्चित झालेली सभा शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता कुसुम सभागृहात होणार आहे.

 

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.सुरेश खुरसाळे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे. ते दूर व्हावे यासाठी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा एक गट महाराष्ट्रात काम करत असून डॉ.चौधरी आणि अ‍ॅड्.सरोदे यांनी आतापर्यंत २७ सभांमधून ‘निर्भय बनो’ची भूमिका विविध क्षेत्रांतील लोकांसमोर मांडली आहे.

नांदेडमधील नियोजित सभेची पूर्वतयारी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील नागरिक व कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी येथे पार पडली. निर्भय बनो चळवळीची भूमिका ज्येष्ठ मुद्रक सतीश कुलकर्णी-मालेगावकर यांनी मांडली. त्यानंतर डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर, रंगनाथ भुजबळ, एकनाथ मोरे, दिलीप शिंदे, बालाजी आबादार, प्रा.मजहरोद्दीन, प्रा.हनुमंत भोपाळे, प्रा.बालाजी कोम्पलवार, बालाजी पेनूरकर, बालाजी जोगदंड, रेखाताई चव्हाण, प्रा.ललिता शिंदे, डॉ.भारती मडवई प्रभृतींनी वेगवेगळ्या सूचना मांडतानाच नियोजित सभा यशस्वी करण्याचा मनोदय व्यक्त केला.

 

वरील बैठकीचे प्रास्ताविक संतोष पांडागळे यांनी केले.

‘निर्भय बनो’च्या सभेला शहर तसेच जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते, प्राध्यापक-शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन कॉ.प्रदीप नागापूरकर, शिवाजी गावंडे, सतीश कुलकर्णी आणि संजीव कुळकर्णी यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *