…. पाऊस आणि ते दोघे
आता पडणारा पाऊस हा शेती किवा निसर्गाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे किवा त्रासदायक आहे हे त्या दोघांना माहीत नाही.. त्यांच्या दृष्टीने रोमॅन्टिक वातावरण , वाफाळलेली कॉफी आणि त्यांची कार इतकेच जग.. काल पाऊण तास तुफान पाऊस पडला आणि रस्त्याना नद्याचं स्वरूप आलं.गणपती पहायला जाणाऱ्या लोकांचा हिरमोड झाला आणि त्या युगुलांना मात्र त्यात स्वर्ग दिसला.. कॉफी कट्ट्यावर बसलेली असताना सहज लक्ष समोरच्या कारकडे गेलं आणि ओठापाशी नेलेला ग्लास तिथेच थबकला कारण तिलाही कट्ट्यावर यायचं होतं पण पाऊस मित्र तिला भिजवेल म्हणुन त्याची चाललेली धडपड मी त्याच्या देहबोलीतुन अनुभवली आणि तिचा हेवा वाटला.. तो भिजतच खाली उतरला , केसावर पडलेले तुषार हाताने झटकले आणि दोन कॉफीची ऑर्डर दिली. कॉफी येइपर्यंत तो बाहेरून कारमधलं सौंदर्य नव्याने न्याहाळत होता..मला वाटलं , अरे यार आता तिथे मी असायला हवे होते पण क्षणात तो विचार पुसुन टाकला आणि मनाशीच म्हटलं , मी तिथे असेन तर मग हे सुख न्याहाळणार कोण ??.. दुसऱ्याच्या आनंदात न्हाहुन निघण्यासारखं सुख नाही.. २ कॉफी असे दादा ओरडल्यावर मी आणि तो हॅंडसम भानावर आलो.. त्याने कप उचलले आणि कारमधे जाऊन बसला.. एव्हाना माझ्या हातातील कॉफी गार झाली होती.. पण कॉफीची मज्जा तीच होती..
कारण माझ्या रोमरोमात त्या दोघांच्या नजरेने थैमान घातले होते..
पावसाची रिपरिप सुरुच होती..माझ्या मित्राने अजुन कॉफी मागवली.. कारमधे बसुन ते दोघे कॉफीचा आस्वाद घेत होते.. मधेच त्यांचे कप एक्सेंज होत होते…तिच्या मधाळ आणि मादक ओठाचा स्पर्श आणि कपावर उमटलेला लिपस्टीकचा डाग मला इतक्या लांबून दिसत होता.. ओठाच्या त्या नक्षीत माझे संपूर्ण शब्द कोरले गेले होते.. तितक्यात आमची कॉफी आली जी मला पुन्हा गार होवु द्यायची नव्हती म्हणुन मी मग हातात घ्यायला वाकले तर कार आणि कपल गायब.. मी मित्राला म्हटलं , किती क्युट कपल होतं ना ते ??.. तो म्हणाला , कुठलं कपल गं ??.. मी म्हटलं , अरे ठोंब्या तु इतका वेळ काय पहात होतास ??.. तुला रोमांस दिसला नाही का ??
त्यावर तो म्हणाला , मी माझ्यासमोर बसलेले सौंदर्य पहात होतो गं त्यामुळे मला काहीच दिसलं नाही.. मी त्या कपावर तुझ्या लिपस्टीकचा डाग पहात होतो… तुझ्या हातातुन कप घेउन मी त्यातली कॉफी पिण्यात मग्न होतो गं.. तुझ्या डोळ्यातले भाव मला वाचायचे होते सोनल .. मग मी माझा मौल्यवान वेळ त्या कपलकडे पाहुन का वाया घालवु ??या त्याच्या वाक्याने माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि स्वतःची लाजही वाटली.. बऱ्याचदा आम्ही लेखक मंडळी इतर सौंदर्य न्याहाळण्यात व्यस्त असतो पण कोणीतरी आपल्यावर जीव ओवाळून टाकतं याची पुसटशी कल्पनाही नसते.. माझे अनेक वाचक मला विचारतात , मॅम तुमच्याकडे सागर (bf) आहे का ?? असे अनेक सागर अवतीभवती आहेत पण मी रमते काल्पनिक विश्वात आणि कृष्णात कारण जिथे फक्त सुख आहे.. अपेक्षा नाहीत त्यामुळे दुख नाही..
( तळटिप.. मी खूपदा रीअल लिहीते पण आज हे काल्पनिक आहे.. नाहीतर माझे मित्र विचार करुन हैराण व्हायचे प्रत्येकाला वाटायचं मी तर नव्हतो ) जो न देखे रवी वो देखे कवी..
सोनल गोडबोले′