मुका पाऊस –
तिच्या तोंडातून गळणाऱ्या लाळंकडं नुसतंच एकटक पाहत बसलेल्या गण्यानं मधूनच वाकून आभाळाकडं पाहिलं. नि नरड्याच्या शिरा ताणून तो किंचाळला, “आता बास कर की, किती कोसळणार?. सगळं धुन तर नेलंस निदान मुकं जनावर तरी वाचू दे.” अन् गुडघ्यात मुंडकं घालून तो रडू लागला. रडण्याच्या आवाजानं सुकत चाललेल्या हिरानं किलकिल्या डोळ्यानं गण्याकडं पाहिलं. नाक दारून लांब उच्छ्वास तिनं सोडला. माणसालाही लाजवेल अशी अपार करुणा भरलेल्या तिच्या डोळ्यांतून टपकन अश्रू गळला.
पाणी मुरलेल्या ओल्या जमिनीवर सर्वांगावर सुया टोचाव्यात अशा गारठ्यात हिरा निपचित पडली होती. गेले पाच-सहा दिवस चाऱ्याविना तिचं शरीर सुकत चाललं होतं. पोटाच्या बाजूला असणारी कातडी सुकून आतल्या हाडांचा सापळा पार खपाटाला गेला होता. बाहेरचा पाऊस नि गण्याच्या डोळ्यांतल्या अश्रूंचा पाऊस याला काही अंतच न्हवता. हिरा अधूनमधून डोळं उघडायची. गण्याकडं पाहत सुस्कारे टाकायची. गण्याला त्याच्या लाडक्या गाभ असलेल्या हिराची काळजी गाव सोडू देत न्हवती. तिच्या गाभाचे शेवटाले दिवस भरीत आलं होते. जाणार तरी कुठं व कसं ? सगळं गावच ठप्प झालं होतं. पुराचं पाणी हां हां म्हणता गण्याच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचलं.
यंदाचा पाऊस उरात धडकी भरवणारा, डोळ्यांतले अश्रूही आटवणारा वाटला. माणूस सोडाच चिटपाखरूही फडफडू नये असा बेफाम पाऊस कोसळत होता. हप्ता सरला तरी उन्हाची कोवळी तिरीपही पडली न्हवती. गण्या घोटभर पाण्यावर आणि घरातल्या शिल्लक असल्या-नसलेल्या धान्यावर कसातरी जीव राखीत आला होता. मूठभर तांदूळ तो कोरडेच खायचा. चुलीतली राखही पावसाच्या पाण्यानं शिल्लक ठेवली न्हवती. तिथं खायचं शिजवायला काडी कुठली पेटवणार ? घरातला असा एकही कोपरा शिल्लक राहिला नाही जिथं ओल न्हवती. गण्यानं घरच्या माळ्यावर आसरा घेतला. घर ते कसलं? बायको-मुलांच्या हसण्या खिदळण्याला तसं पोरकंच होतं ते. चार आडोसे असलेली पत्रा मारलेली माती-दगडाची खोलीच ती. पुराच्या पाण्यानं गण्याच्या घरचा उंबरठाही पार केला.आता गण्याचं आवसान पार गळलं. माळ्याच्या खालच्या अंगाला हिरा निपचित पडलेली… गण्या माळ्यावरून खाली उतरला अन् हिराच्या गळ्यात गळा टाकून हमसून रडू लागला.
पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी माळ्यावर हिराला चढवणं अशक्यच होतं. त्यातल्या त्यात त्यानं पाण्यात डुबलेल्या जळणातलं चार-पाच लाकडी ढोपरं घेतलं नि चारी बाजूंनी हिराच्या अंगाखाली लावली… जेणेकरून थोडं तरी पाणी तिच्या अंगावर येणार नाही. पुन्हा तो माळ्यावर जाऊन बसला. दोन्ही पाय जवळ घेऊन हातांची घडी गुडघ्यांवर ठेवली आणि हताश नजरेनं तो हिराकडं पाहू लागला.
आता हिराच्या पायाला पाणी लागलं… हळूहळू पाणी पोटापर्यंत चढलं तशी हिरा हडबडली… थोड्याफार ताकदीनिशी तिनं पाय झाडलं नि बारीकशी हंबरली. हे पाहून माळ्यावरून गण्या खाली आला. तो कमरेपर्यंत पाण्यात डुबलेला होता. त्यानं त्याच्या उरल्यासुरल्या ताकदीनं हिराच्या अंगाखाली दोन्ही हात घालून तिला हलवण्याचा वेडा प्रयत्न केला पण तिच्या पोटातल्या जीवामुळे तिचा अधिकचा भार तिला हलूच देत न्हवता… काळ कसोटीचा होता… बाहेर पावसानं जहरी थैमान घातलेलं… आता गण्या हतबल होऊन हिराला कवटाळूनच बसला.
त्यानं डोळं मिटलं न काहीतरी चमत्कार घडून दोघांचं जीव वाचावंत असा धावा तो मनोमन करू लागला. पाणी वाढू लागलं तशी हिरा धडपडू लागली. गण्या तिला घट्ट पकडून बसला होता. हिरा बारीक आवाजात हंबरू लागली… तिचा स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती निकराचा लढा देत होतीच, सोबतच गण्यानं त्याचा जीव वाचवण्यासाठी तिथून निघून जावं असंही तिला वाटत असावं… शब्दांविना मुकीच ती शेवटी… न बोलता येणाऱ्या पावसासारखी.
“ये गण्या, लवकर बस ये नावतं.” गावातल्या एका दोस्तानं आवाज दिला. दारात माणसांनी गच भरलेली नाव उभी होती. आवाज ऐकताच गण्या तरतरला. गण्यानं उभारून एक पाऊल नावेच्या दिशेनं टाकलं. तोवर हिराचं हंबरणं ऐकून तो जागीच थबकला! “आरं थांबू नगं ये बिगी बिगी. आता परत माघारी मरायला कोण येतंय हिथं.
पाऊस पार पिसाळलाय.” भला दोस्त गण्याला बोलला. गण्यानं नावेवर एक नजर टाकली व पुन्हांदा लाडक्या हिराच्या पाणीदार डोळ्यांत पाहिलं… तिच्या पोटाकडं पाहून तर त्याचं मन अधिकच कालवलं…
नंतरही पाच-सहा दिवस पाऊस वेड्यासारखा बरसून गेला. होतं-न्हवतं सगळं ओरबाडून गेला. सरकारी पंचनाम्यात नदीतून वाहत आलेली एक जोडी टीव्हीवाल्यांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरली… गण्याची हिरा! माणसांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं न देता मुका पाऊस मूक हिराला, तिच्या पोटातल्या मुक्या जीवाला नि गण्याला घेऊन गेला… अन् एका शेतकऱ्याची त्याच्या गायीवरच्या अपार भूतदयेची, प्रेमाची कहाणी पुराच्या लाटांवर तरंगून गेली! एक पाऊस असा ही…
रूचिरा शेषराव बेटकर,नांदेड.
9970774211