नातं

 

तसं… पाहिलं तर ते दोघे आजूबाजूलाच राहणारे पण आयुष्याचा गाडा ओढताना एकमेकांपासून खूप दूर होते अगदी अनोळखीच, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मैत्रीचा धागा विणला गेला आणि मग सुरू झाली ती मैत्रीची भावना, पोस्ट केल्यानंतर इतरांसोबत कमेंट करणं आणि दाद देणं. कमेंटमध्ये आपल्या भावना आपली मते मांडताना कुठे तरी एकमेकांच्या मनाला पटत जाणारी एक मानसिक निर्मळता. काही दिवसात मग इनबॉक्सचा वापर व्हायला लागला, इथं मात्र दिल खुलून बोलणं सुरू होत, मनाचा कल सांभाळत मनातील बोलताना मनाची उकल खूप सोप्प्या पद्धतीने झाली.
अनोळखी जगात आपलंसं वाटणार एक व्यक्तिमत्त्व निर्माण होऊन त्याचं मैत्रीत छान रूपांतर होते. मनातलं सांगायचं म्हणजे अजून तरी सुख दुःख वाटण्यासारखी मैत्री झाली अस म्हणता येणार नाही पण स्वतःच प्रतिबिंब एकमेकांत शोधण्यासाठी धडपड सुरू व्हावी असंच काहीसं होतं. दोघांही यशस्वी होण्यासाठीचा केलेला प्रवास पूर्ण झाला होता आणि आज ते प्रेम, आपुलकी, जिव्हाळाच्या शोधात मार्गस्थ झाले होते, एकमेकांना मिळालेल्या अनुभवाची शिदोरी कामी येणार होती.
त्यात पण ते यशस्वी होतीलच या एका अनाहूत नात्याची मनस्वी अपेक्षा घेऊन मैत्रीची सुरुवात केली. कोणत्याही नात्याला नीट जोपासायच असेल तर आधी स्वतःला नीट ओळखता यायला हवं. स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची ताकद ही माहीती असायलाच हवी. स्थिर मनाने नात्याचा विचार करता यायला हवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नात्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान आपल्याला पक्क माहीती असायाला हवं. थोडक्यात नात्याकडे बघायची एक समज हवी, नजर हवी जी नात्याला पोषक ठरेल.
बर्याचदा मानसिक रित्या स्थिर नसताना भावनेच्या भरात नात्यात निर्णय घेतले जातात आणि होरपळ होते सगळ्यांचीच. त्यामुळे आधी स्वतःच मन स्थिर करा. स्वतःला जर समजत नसेल… कसं करायच तर मदत घ्या, कारण त्यांचा मनाचा अभ्यास असतो आणि त्यांच्याकडे एक त्रयस्थ, व्यापक नजर ही असते. पण भावनिकतेने निर्णय घेऊन मग फरफट करण्यात मन आणि शरीर दोन्हीची दमणूक होते.
प्रत्येक नातं यशस्वी व्हावं ही एकच इच्छा.
बसं इतकंच……

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *