.. भोवनी प्रामाणिकपणाची..
भरपुर फळं खाऊन ( ब्रेकफास्ट करुन ) हातात मोबाईल घेतला तोही माझ्या रियाजासाठी म्हणजेच लिखाणासाठी आणि त्याचक्षणी समोर दिसले ते माझे वाचक कारण मी त्यांना रोज लेख वाचायची लावलेली सवय ..खरं तर तुमच्यामुळेच मला रोज नवीन लिहायची सवय लागली आहे..आज सकाळी एक प्रॉमीस द्या.. मी रोज वाचेन आणि त्यातलं उत्तम वेचुन माझ्या आयुष्यात त्याचा उपयोग करेनआणि मी तुम्हाला प्रॉमीस करते उत्तमातील उत्तम मी तुमच्यासाठी लिहीत राहीन कारण तुम्ही आहात म्हणुन माझ्या लेखणीला अर्थ आहे..
नोटपॅडवर लिहायला जाणार इतक्यात भंगारवाल्याचा आवाज आला.. सचिन ला म्हटलं , अरे कुलर द्यायचा आहे ना.. बाहेर मुलगा आलाय बघ.. २५ शीतला तरुण होता.. तो गार्डनमधे आला आणि कुलर उचलुन घेउन गेला.. भंगार किवा रद्दी याचे पैसे आम्ही कधीही घेत नाही कारण जी गोष्ट आपण विकत घेतली त्याचा उपभोग आपण घेतलेला असतो .. पुन्हा त्यातुन पैसे काढत नाही आणि दुसरं म्हणजे त्या छोट्या अमाउंटचा त्यांना जास्त उपयोग होतो.. गेट लावुन सचिन आत गेला आणि मी लिखाणात डोकं घालणार इतक्यात तो मुलगा पुन्हा गेटवर आला आणि म्हणाला , मॅडम हे पैसे घ्या , सकाळी सकाळी भोवनी होइल असं म्हणत प्रामाणिकपणे २० रुपयाची मळकट नोट हातात ठेवली.. सकाळी सकाळी माझ्या हातात अपेक्षा न करता लक्ष्मी आली होती .. त्या नोटेकडे मी पहात असताना तो तिथुन निघुन गेला .. पण तो साधा भंगारवाला मुलगा रिकाम्या हाताने निघुन गेला नाही तर मला निशब्द करुन गेला.. त्याच्या कमी शिक्षणापुढे आणि गरीबीपुढे मी नतमस्तक झाले.. मनात चटकन आलं, देवा याला जे हवं ते दे.. कायम सुखी आणि आनंदी ठेव.. मी इतकी छोटी आहे की त्या मुलासाठी फक्त इतकच मागु शकले कारण त्याने मलाच २० रुपयाची नोट देउन त्याचा प्रामाणिकपणा दाखवत तुमच्यासाठी लेख देउन गेला.. हा फक्त लेखाचा विषय नाही तर त्याच्याकडचा प्रामाणिकपणा दिसला.. खरे पणा दिसला.. देण्याची वृत्ती दिसली आणि विशेष म्हणजे मला माहीत नसलेली एक गोष्ट त्याने न बोलता सांगितली ती म्हणजे मला आतापर्यंत वाटायचं , सकाळी पैसे आले की भोवनी होते पण इथे त्याचे पैसे जाणार होते तरीही तो त्याला भोवनी होइल मॅम असं म्हणाला.. नंतर विचार केल्यावर जाणवलं , कदाचित त्याला त्यातुन जास्त पैसे मिळणार असतील म्हणून असेल..
मी नेहमी म्हणते , आपण कुठे रहातो, किती मोठ्या किवा छोट्या घरात रहातो , गाडी आहे की नाही किवा अकाउंटमधे किती पैसे आहेत .. आपले मित्र आपल्या तोलामोलाचे आहेत की नाही याने आपल्या आयुष्यात फरक पडत नाही पण संस्काराने आणि विचाराने नक्कीच फरक पडतो .. सुदामा आणि कृष्ण यांची मैत्री यासारखं उत्तम उदाहरण असुच शकत नाही.. आपण श्रीमंत असण्यापेक्षा संस्कारी असणं हा मोठा मेसेज पुन्हा एकदा त्या मुलाने मला दिला..
सोनल गोडबोले