नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावेत या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणासाठी आज खडकी,वडवणी आणि पिंपरी येथील सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला . यावेळी खडकी ग्रामस्थांच्या वतीने हभप जगनाथ महाराज पाटील यांचे भव्य कीर्तने आयोजित करण्यात आले होते. या रॅलीत आणि कीर्तनासाठी हजारो सकल मराठा बांधव सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मागणी घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत .मात्र जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा नायक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील विविध भागात साखळी उपोषण, निदर्शने ,आंदोलने सुरू आहेत . राज्य सरकारने जरांगे पाटील यांना आरक्षण देण्याच्या अनुषंगाने 30 दिवसाची मुदत मागितली होती मात्र जरांगे पाटलांनी तब्बल 40 दिवसाची मुदत दिली तरीही मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले नाही. कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण देण्याची भूमिका आमची असल्याचे सांगून राज्य सरकारकडून केवळ वेळ काढूपणा सुरू आहे . सर्वच राजकीय पक्षांना आरक्षण देण्यासाठी आपण अनुकूल असल्याचे सांगण्यात येते परंतु प्रत्यक्ष आरक्षण का दिले जात नाही असा सवाल सकल मराठा समाजाच्या वतीने उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अंतरवाली येथे पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसले असल्याने या उपोषणाला पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील अनेक गावातून दररोज मोठी आंदोलने केली जात आहेत. आज खडकी, वडवणी आणि पिंपरी येथील सकल मराठा समाज बांधवांनी ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकार्यालय गाठले. यावेळी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडले. त्यानंतर खडकी ग्रामस्थांच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालय येथे हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कीर्तन सोहळ्यातून प्रवचनातून मार्गदर्शन करताना ह भ प जगन्नाथ महाराज पाटील यांनी मराठा आरक्षण देण्याची इच्छा असेल तर तात्काळ द्या , समाजाच्या शांततेचा आणि संयमाचा अंत पाहू नका . जर मराठा समाजाचा संयम सुटला तर केवळ इतिहास नाही तर या राज्याचा भूगोल बदलेल असा गर्भित इशाराही ह भ प जगन्नाथ महाराज पाटील यांनी दिला आहे . श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना आरक्षण कसे द्यावे ह्याचे गणित समजले असेल तर सत्ताधाऱ्यांना का समजत नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला . राज्य सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अभ्यास करावा लागत असेल आणि तो अभ्यास पूर्ण होत नसेल तर आम्हाला आता अभ्यास करावा लागेल आणि वर्षभरानंतर मराठा समाजाचा जो कोणी अभ्यासक असेल त्याला सत्तेत आणावा लागेल असा इशाराही या निमित्ताने ह भ प जगन्नाथ महाराज पाटील यांनी दिला आहे . या आंदोलनात महिला आणि पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.