मी जाता राहील कार्य काय.

हा निसर्गच मला लिखाणाची उर्जा देतो..रोज त्याच्या कुशीत गेल्यावर रोज नव्याने जगण्याचे पैलु उमगतात.. गेली २० वर्षे या टेकडीवर सातत्याने जाते आणि रोजच तेथील पानं , फुलं . प्राणी , पक्षी , पाणी नवे भासतात.. रोज सुर्य उगवतो आणि माझ्या पदरात अनमोल शब्द देउन जातो रोज तो मावळताना दिवसाचा हिशोब मांडुन जातो..मीही वेडी नित्यनेमाने त्यात रमते , फोटो काढते , निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करते…
आज असच टेकडीवरुन उतरताना विचार करत होते .. अगदी १५ दिवसांपूर्वी नवरात्री मधे येणारी केशरी पिवळी फुले आता कोमेजुन गेली होती.. अजुन १५ दिवसाने झाडही दिसणार नाही..त्याच ठिकाणी मी फोटो काढले होते.. रिल्स केले होते आणि त्याकडे फार न पहाता घरी निघुन आले.. त्यांचं त्यांनी काम केलं आणि ती निघुन गेली त्याचवेळी मला भा.रा. तांबे यांची कविता आठवली.. जन पळ भर म्हणतील हाय हाय .. मी जाता राहील कार्य काय..
कितीही मोठी आणि कर्तृत्ववान व्यक्ती असली किवा फुलं असतील, प्राणी असतील प्रत्येकाची हीच परिस्थिती…दरवर्षी पाऊस येतो.. नव्याने आपण भिजतो.. पाऊस जातो म्हणुन थंडीची वाट पहातो आणि थंडी जास्त असली की उन्हाळ्याचं महत्व समजतं.. काल भोरला जाताना झेंडूची मोठीच्या मोठी शेती पाहिली .. फोटो काढले .. रील्स केले दसरा आणि लक्ष्मी पुजन यालाच त्याचं महत्व हे त्याला माहीत असूनही उन्हात तळपत सगळ्याना आनंद देत वाऱ्यावर झुलत ती फुलं उभी होती.. तसच प्रत्येक फळांचं .. सीझन ला येतात आणि निघुन जातात.. मग कायमस्वरूपी काय रहातं ??.. फेम ही नाही.. सौंदर्यही नाही..
तिथुन थोडी खाली आले तर दोन भुभु दिमाखात बसले होते .. त्यांचाही फोटो घ्यायचा मोह आवरला नाही.. फोटो काढुन झाल्यावर एकजण माझ्याजवळ येउन प्रेम करु लागला.. त्याची शेपटी हलवत आनंद व्यक्त करत होता .. ना मी त्याला खाऊ दिला तरीही देत रहाण्याची वृत्ती फक्त या सगळ्याकडे आहे आणि आपल्याकडे घेण्याची.. श्रीकृष्णाने सांगितलेले कर्म करत रहा हे वाक्य आपण सोडुन सगळ्यानी लक्षात ठेवलय..
Nothing is permanent हेच खरय ना त्यामुळे आहेत ते क्षण आनंदात जगुया .. जमेल तसं आणि तेवढं दुसऱ्याला सोबत घेउन..

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *