नांदेड ; ( प्रतिनिधी )
भाजप महानगर नांदेड यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर क्रिकेट विश्वचषकाचे सामने मोफत दाखविण्याच्या उपक्रमाचा लाभ शेकडो क्रीडारसिक लुटत असून रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ विजयी झाल्यास अभूतपूर्व जल्लोष करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.तसेच ” कौन बनेगा विश्वविजेता ” या स्पर्धेमध्ये बहुतेकांचे अंदाज चुकल्यामुळे क्रीडा रसिकांना सहभागी होण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात. सामने दाखवण्याचे हे विक्रमी पंधरावे वर्ष आहे. नेहमीप्रमाणे ” कौन बनेगा विश्वविजेता “स्पर्धेचे आयोजन दिलीप ठाकूर यांनी केले होते. दहा विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार होते. परंतु सहभाग घेतलेल्या शेकडो स्पर्धकांपैकी फक्त एका स्पर्धकाचे उत्तर आत्तापर्यंत योग्य आले आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांना आणखी एक संधी देण्यात येत आहे.इच्छुकांनी अंतिम फेरीत विजय मिळवणाऱ्या संघाच्या नावासोबतच सर्वात जास्त धावा काढणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूच्या नावाचा अंदाज व्यक्त करायचा आहे. त्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ९४२१८ ३९३३३ या मोबाईल नंबर वर स्पर्धकांनी स्वतःचे नाव व गाव लिहून आपला अंदाज व्यक्त करायचा आहे.अचूक उत्तर देणाऱ्या दहा विजेत्यांना एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. दहापेक्षा जास्त स्पर्धकांनी अचूक उत्तर दिल्यास जाहीर सोडतीद्वारे दहा स्पर्धकांची निवड करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. एका मोबाईल वरून फक्त एकदाच भाग घेता येईल.
भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सचिव डॉ. सचिन उमरेकर यांनी संभाजी उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथे सामने दाखवण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने पाहताना प्रत्यक्ष स्टेडियम मध्ये सामने पाहण्यासारखे वाटत आहे. भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक विकेट घेतल्यानंतर तिरंगे झेंडे उंचावत प्रेक्षक आनंद व्यक्त करत होते. भारतातर्फे मारण्यात आलेल्या प्रत्येक चौकार व षटकारांचे ढोल ताशा वाजवून स्वागत करण्यात येत होते. भारताच्या प्रत्येक विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, प्रदीपसिंह हजारी,कामाजी सरोदे ,सुरेश शर्मा राजेश पावडे ,प्रभुदास वाडेकर,ॲड.करण जाधव,जनार्दन वाकोडीकर, शेख इम्रान, चक्रधर खानसोळे,शेख वाजीद, विलास वाडेकर,शेख बबलू, विजय वाडेकर हे परिश्रम घेत आहेत.रविवार दि.१९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता भारत ऑस्ट्रेलिया या सामन्याचे उद्घाटन भाजप महानगर उपाध्यक्ष शशीकांत भुसेवाड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अशोक धनेगावकर, राजू गोरे, सुशीलकुमार चव्हाण, कृपालसिंग हुजूरिया, संतोष परळीकर, क्षितिज जाधव हे उपस्थित राहणार आहेत.संभाजी उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथे आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा तसेच भारतीय संघाच्या विजयी जल्लोषात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक ॲड.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी केले आहे.