आठवण .. गुरुजींचे गुरुजी : र .गो. साखरे — मोतीराम राठोड,नांदेड

 

नांदेड जिल्हा व महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे मार्गदर्शक गणिततज्ञ प्राचार्य र. गो. साखरे सर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे *पुणे* येथे दुःखद निधन असा संदेश वाचला आणि आठवणीच्या भावविश्वात गेलो.
१९८२- ८३चा काळ होता. एम.ए. प्रथम वर्षाला पिपल्स महाविद्यालय नांदेड येथे प्रवेश घेतला.का शिकायचं हेच माहित नव्हतं.त्या काळी पुस्तकी ज्ञान व्हतं पण व्यवहारी ज्ञान फारसं नव्हतं.आता सारखं नोकरीसाठी शिक्षण असं काही मनात नव्हतं. पण माझ्या वर्गातील काही मित्र बी.एड्. करायचं असे चर्चा करायचे.मग मी ही बी.एड्. करण्याचं ठरविलो.”मी व जळकोटचा माझा मित्र व्यंकट डांगे दोघांनी नांदेडच्या शासकीय बी.एड्. कॉलेजला फॉर्म भरलो व आम्हा दोघांचाही नंबर लागला.
प्रवेश प्रक्रिया एप्रिल मे मध्ये पूर्ण झाली. जूनपासून कॉलेज सुरू झालं .शंभर विद्यार्थ्याची बॅच होती. सुरवातीचे काही दिवस केवळ धिंगाना करण्यातच गेले. असं का होत होतं ? प्राध्यापक चर्चा करु लागले ,यापूर्वी असं कधी झालं नाही. कारण यापूर्वीच्या बॅचमध्ये नोकरी करत असलेल्या शिक्षकाची संख्या पन्नास टक्के होती व नविन विद्यार्थी संख्या पन्नास टक्के होती. नोकरीत असलेले शिक्षक काही नियम, बंधन पाळत असत. त्याचं पाहून बाकीचेही नियम ,बंधन पाळत. त्यांचा अनुभव नवीनच्या कामी येत होतं पण इथं तर सर्व नवे करकरीत होतं. सेवा अंतर्गत शिक्षकांच प्रशिक्षण बंद करून सगळे नविन विद्यार्थी .
आमची बॅच म्हणजे १९८३- ८४ची पहिली फ्रेश बॅच.आमच्या बॅचमध्ये एकही सेवा अंतर्गत प्रशिक्षण घेणारा शिक्षक नव्हता. धंप्पलवार सर झटका देवून जोरात हसायचे व म्हणायचे, “पांढऱ्या केसांचे गुरुजी खूप छान शांत बसायचे वर्गात.” खरं सांगतोय आम्हाला त्यावेळी गुरुजीनी कसे वागावे ?कसे बोलावे हेच कळाले नव्हते. आम्ही वर्गात गप्प बसत नाही हे पाहून कॉलेजच्या प्राचार्य साहेबांनी एक सहविचार सभा घेतली.त्यात आम्हाला गप्प बसविण्यासाठी मार्ग शोधण्यात आला.

सुरवातीस दररोज पाहिला तास गोडबोले सर किंवा धंप्पलवार सर घ्यायचे. वर्गात उभा धिंगाणा चालायचा.त्यावेळी सावळ्या रंगाचे,बोलके डोळे असेलले. हसरा चेहरा,बहुधा डाव्या बाजूने केसांचा भांग पाडलेले,बाकी केस छानपैकी सरळ मागे विचंरलेले, वरचे समोरचे दोन दात थोडेसे मोठे व समोर आलेले हाते. सडसडीत पण मजबुत बांध्याचे ,पांढरा शर्ट व पांढरा पॅन्ट घातलेले गुरुजी वर्गात आले. काय जादू होती त्यांच्याकडे मला माहीत नाही पण सगळा वर्ग सामसूम झाला.ते गप्प बसा असं सुद्धा बोलले नाहीत.तरीही कोणी बोलेलं नाही,हालचाल केली नाही.
आम्ही सर्वजण त्यांच्याकडे एकटक बघत राहीलो.ते तासभर आमच्याशी बोलले.शिक्षक कसा असावा?शिक्षकांनी कसे बोलावे ? कसे वागावे याबदल माहिती सांगितली.ते सर होते *र.गो.साखरे सर*.त्या दिवसापासून आम्ही सगळे वर्गात शांत बसू लागलो.आता धिंगाणा कुणी केला तर वर्गात असणारे गुरुजी आम्हाला म्हणायचे, “बोलावू का साखरे सरांना”. सगळा वर्ग चिडचूप व्हायचा.

साखरे सरांचा तास म्हणजे निखळ खळखळता वाहणारा आनंदी झरा होता. सरांचा तास संपूच नये असं प्रत्येकाला वाटायचं.सरांचे वर्गातलं निरीक्षण फारच बारकायीचं असायचं.थोडीही खोडी करणारा सरांच्या नजरेतून सुटत नसे. आमच्या वर्गात एक माझा जवळचा नातलग होता.तो घरून सधन होता. तो कॉलेजमध्ये नियमित येत नसे. त्याची हजेरी अधून मधून मीच देत असे. त्याचा हजेरी क्रमांक पंचविस होता .तर योगायोगाने माझा हजेरी क्रमांक बावन्न होता.ऐके दिवशी तिसऱ्या तासात साखरे सर हजेरी घेत होते. माझ्या मनात धूकधूक होती. मी जर माझ्या नातलगाची हजेरी दिली तर कदाचीत त्यांना कळेल. आतापर्यंत मी दुसऱ्याची हजेरी देतो हे कोणत्याही सरांच्या ध्यानात आले नव्हते,तसा मी वर्गात शांत विद्यार्थी होतो.साखरे सर नंबर पंचवीस म्हणल्याबरोबर मी खाली मान घालून हळू आवाजात येस सर म्हणालो. पुन्हा बावन्न नंबर आला,मी वर मान करून जोरात येस सर म्हणालो.सरांनी माझ्याकडे पाहिले सुध्दा नाही.सर हजेरी घेत होते.मला वाटलं आता येणारं संकट टळलं.मी आनंदात बाजूच्याची बारीक चिमटी काढत म्हणालो, “सुटलो गा एकदाचं” आणि आम्ही हळूच हसलो.

सरांनी हजेरी घेणे झाल्यावार मग हळूच म्हणाले, “राठोड ऊठ. इकंड ये”.माझं काळीज धडधड करायला लागलं.मी जाग्यावर थांबलो. तेवढयात सर म्हणाले , ” तिथंच थांब” . मला सांग तूझा नंबर पंचवीस का बावन्न ? तू चव्हाण का राठोड?” हे ऐकून माझी पाचावर धारण बसलेली. मी बराच वेळ खाली मान घालून अपराध्यासारखं थांबून राहीलो. सर मला म्हणाले,”लक्षात ठेवा, भावी शिक्षक होणार आहात चांगले गुण जोपासा.” मी सरांची माफी मागितलो. सरांनी मला “पुन्हा असली चुक करु नको” अशी समज देवून माफी दिली.
साखरे सर आम्हाला मानसशास्त्र शिकवायचे. तर गणित पद्धतीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवायचे. मला गणिताचा लहानपणापासूनच कंटाळा.मला गणित विषय नको वाटायचा. पण साखरे सरांनी मीन, मोड,फ्रिक्वेन्सी या गणितातील संकल्पना सांगताना खूप हसत खेळत समजावून सांगितल्या,हे मला आजही आठवते.मलाही सरांचा तास आवडू लागला .

मानसशास्त्रीय प्रयोगही ते अतिशय मनोरंजक पध्दतीने समाजवून सांगायचे.पॅवलॉवचा प्रयोग असो की शिकवण्याच्या पध्दती सोप्याकडून अवघडाकडे, चुका आणि शिका असो ,सरांचा तास म्हणजे निर्मळ ज्ञानाचा झरा. त्या निर्मळ झऱ्यातून ज्ञान सतत झूळूझूळू वाहत राहयचं . निर्मळ विनोद सांगून विद्यार्थ्यांना ताजेतवाने ठेवायचे.मग निर्मळ ज्ञान झऱ्यातून वाहणाऱ्या झऱ्यातील ज्ञान विद्यार्थी ज्यांच्या त्याच्या कुवती प्रमाणे प्राशन करत राहायचे. साखरे सर कधीच कोणावर रागावले नाहीत. प्रत्येकांची अडचण लक्षात घेवून त्यांना समजावून सांगायचे. भविष्यात वर्गात शिक्षकांचं वर्तन कसं असावं या विषयी ते नियमित सांगायचे,”शिक्षकात आई व वडीलाचे गुण असावेत. एकाच वेळी शिक्षकांनी वर्गात आई वडीलाची भूमिका वठवावी.घरात जसं वडील शिस्त ठेवतात.मुलामुलीवर करडी नजर ठेवतात.तसं शिक्षकानी वर्गात शिस्त ठेवली पाहिजे,पण बापाचं काळीज हारपू नका. बापासारखी वर्गात शिस्त ठेवताना आईसारखं काळीज ठेवून मुलामुलीना प्रेम द्या.विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका.”ही त्यांची शिकवण.

पुढे मी विष्णुपूरीच्या जि.प. शाळेत असताना साखरे सर आले होते.बहुधा १९९४-९५ साल होतं. त्यावेळी हसत हसत सर शाळेच्या मुख्याध्यापकांना म्हणाले,”माझे विद्यार्थी कधीच कामचुकारपणा करणार नाहीत.जशी आपली बाईललेक दिलेल्या घरी सासरचे लोक कसेही असो कितीही त्रास देवो पण ती माहेरसाठी कष्ट दुःख सहन करत संसार करते आईबाबाच्या नावाला बट्टा लागू देत नाही तसेचं माझे विद्यार्थी आहेत.”
गणिताबदल सरांनी एकदा एक सुंदर उदा.दिले होते. एक शिक्षक वजाबाकी शिकवताना आंबे आणि बोरं एकत्र करुन त्यातून काही बोरं बाजूला काढले व विद्यार्थाला विचारले आता शिल्लक किती राहिले ? विद्यार्थी गोंधळून गेले. नेमके बोरं किती राहीले की आंबे किती राहीले हे त्याला कळत नव्हते. तेव्हा साखरे सर म्हणाले , ”गुरुजी गणितात वजाबाकी शिकवताना एकाच प्रकारच्या वस्तू घ्या. बोरं बाजूला काढा. आंबे बाजूला काढा. आंब्यातून आंबे वजा करा किंवा बोरातून बोरं वजा करा. आता मुलं पटापट सांगतील. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या गुरुजीनी कृती केली व विद्यार्थीही पटापट उत्तरे देत होती.
साखरे सर गणिताचे गाढे अभ्यासक व तज्ज्ञ मार्गदर्शक होते तसेच बाकी विषयाचेही त्यांना सखोल ज्ञान होते.मराठी लिहितांना झालेल्या चूका ते पटकन सांगायचे.त्यांना मराठीत इंग्रजी शब्द चालायचे नाहीत. नांदेड जिल्हा गणित अध्यापक मंडाळासाठी त्यांनी भरीव कार्य केलेले आहे. महाराष्ट्रातील गणित अध्यापकांचा आधारवड म्हणून ओळखले जाणाऱ्या साखरे सरांच्या जाण्याने गणितप्रेमींवर दुःखाची छाया पसरलेली आहे.एक शिक्षक ते बी.एड्.काॅलेजचे प्राचार्य असा त्यांचा प्रवास माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडविणारा आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती व बालभारती मधील पुस्तकांचे संपादन यामध्ये सरांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
आज साखरे सरांचे शैक्षणिक कार्य व कर्तव्य निष्ठा आमच्यासाठी आहे.त्यांचे विचार त्यांच्या शेकडो विधार्थांकडून जतन केले जातात.हीच त्यांना खरी आदरांजली आहे.
माझ्या साखरे सरांना भावपूर्ण अभिवादन .

 

मोतीराम रूपसिंग राठोड
९९२२६५२४०७
“गोमती सावली “, काळेश्वरनगर,
विष्णुपुरी , नांदेड -६ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *