काल ख्रिसमस असल्याने मी आणि सचिन कॅंपमधे जायचा प्लॅन केला होता पण त्याच्या काही कामामुळे त्याला माझ्यासोबत यायला जमणार नव्हते त्याचवेळी देवरुपी मित्र दारात गाडी घेउन हजर झाला कारण काय तर सोनल च्या चेहऱ्यावर आनंद पहायचाय.. आम्ही दरवर्षी २५ डिसेंबरला कॅंपमधे जातो… सुंदर माहोल असतो.. मोठ्याने लावलेल्या म्युझिकचा त्रासही होत नाही.. त्या एरीयाला जत्रेचं स्वरूप येतं आणि त्या गर्दीतही मला काही कॅरॅक्टर सापडतात जी माझ्या लेखणीत रमतात पण काल दिसलेली तरुणी ही मला दिसली नाही तर माझ्या मित्राला दिसली..
उत्सुकता आहे ना कोण होती ती ??.. थांबा की जरा आधी मी काय केलं ते सांगते.. मी केलं म्हणण्यापेक्षा माझ्या मित्राने माझ्यासाठी काय केलं ते सांगते… मी कायम लहान गोष्टीत आनंद शोधते आणि त्यात रमते.. रीलसाठी फुगेवाल्याला पैसे दिले आणि फुगे उडवण्याचा आनंद मी घेतला आणि मित्राने तो टिपला.एका फुगेवाल्याकडे समाधान झालं नाही म्हणुन दुसरीकडे रंगीत फुगे होते तिथे पुन्हा जाऊन फोटो काढले .. आपल्या आनंदामुळे कोणाच्या तरी ( फुगेवाल्याच्या )चेहऱ्यावर आनंद येणार होता कारण त्याची भाकरी त्यावर अवलंबून होती.. माझे मित्र अनेकदा असं काही देउन जातात की लिहायला माझ्याकडे शब्द नसतात. त्यानंतर पेस्ट्री खाल्ली आणि आज सकाळी २ जास्त राउंड धाऊन आले … कारण ती पेस्ट्री माझ्या पोटावर टायर रुपात स्थिरावायला नको होती.
पुढे काय झालं .. त्या गर्दीत एक सुंदर तरुणी होती .. वय वर्षे नक्की ७० च्या पुढे असावं.. डोळ्याला गुलाबी ग्लासेस .. डोक्यावर छान क्राऊन आणि सोबत त्यांचं कुटुंब .. ते सेल्फी घेत होते.. त्या तरुणी ला ना आवाजाचा त्रास होता ना गर्दीचा.. त्यांना फक्त आनंद घ्यायचा होता .. त्यांना आम्ही पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्या नजरेत भरुन घेतला तितक्यात मित्र म्हणाला , सोनल त्यांच्यासोबत फोटो घे म्हणजे तुला उद्या त्यावर लिहीता येइल.. फोटो म्हटल्यावर त्या हसत लगेच जवळ आल्या. माझ्यासोबत असलेल्या फोटोत त्यांचा आनंद तुम्ही पहाच.. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता.. आनंद घ्यायला प्रत्येक वेळी खुप पैसा लागतोच असं नाही.. फक्त उत्साही राहायची मानसिकता हवी.. असे अनेक तरूण तरुणी आम्ही काल तिथे पाहिले.. प्रत्येकजण काही देत होता आणि घेत होता.. ती गर्दी नव्हती तर रसिकतेला मिळालेली दाद होती.. गर्दीतही जेव्हा आपल्याला सुंदर काही गवसतं तेव्हाच सुंदर शब्द प्रसवतात आणि तुमच्यापर्यंत पोचतात..
माझ्या मित्रांची मी कायम ऋणी आहे .. कारण ते कायमच मला आनदी ठेवतात… आजचं आर्टीकल त्या तरुणीला आणि माझ्या मित्राला समर्पित.
सोनल गोडबोले
.