नांदेड : प्रतिनिधी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कडाक्याची थंडी पडल्यामुळे कायापालट उपक्रमाच्या ३९ व्या महिन्यात ४२ भ्रमिष्ट व्यक्तींची कटिंग दाढी केल्यानंतर गरम पाण्याने स्नान घालून नवीन कपड्यांसह स्वेटर,शंभर रुपये बक्षिसी, चहा फराळाची व्यवस्था करून अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केल्याबद्दल धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाजपा ,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्यावतीने खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.नांदेड शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार,बेघर,अपंग, कचरा वेचणारे यांना सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा,महेश शिंदे, कामाजी सरोदे,संजयकुमार गायकवाड यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसर, गोवर्धनघाट नांदेड येथे आणले. डोक्यावरील केस व दाढी वाढलेल्या या सर्वांची स्वंयसेवक बालाजी खोडके व त्यांच्या मुलाने काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.
त्यानंतर सर्वांना गरम पाण्याने येथेच्छ आंघोळ घालण्यात आली .स्वच्छ व मुबलक गरम पाण्याची व्यवस्था भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांना स्वेटर,नवीन पँट ,शर्ट, अंडर पँट, बनियन व शंभर रुपये बक्षीसी देण्यात आली. सर्वांना स्नेहलता जायस्वाल व सविता काबरा यांच्या हस्ते चहाफराळ वाटप करण्यात आला. चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर बाबा शिवमंदिरचा परिसर ॲड.चिरंजीलाल दागडिया यांनी झाडून स्वच्छ केला.डॉ.दि.बा.जोशी व डॉ. व्ही.एस.पाटील यांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केले.अनेकांची मलमपट्टी करण्यात आली. हे पाहून अनेकजण गहिवरून गेले.
यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन तास बेघरांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकल्यानंतर वाढदिवस असताना देखील गुलाबी थंडीत झोपायचे सोडून दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा अविरत सुरू ठेवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
( छाया: संघरत्न पवार,संजयकुमार गायकवाड )