साहित्य सम्मेलन आणि भाषाशुध्दी..

 

 

नुकत्याच एका साहित्य सम्मेलनाला गेले होते.. एकाने सम्मेलन भरवलं की दुसऱ्याला वाटतं मीही सम्मेलन भरवावं..
आपल्याकडे नळातला न आणि बाणातला ण ही मुळात दोन वेगळी मुळाक्षरे आहेत हे कित्येक शाळेतील शिक्षकानाही माहीत नाही त्यामुळे मुलांना माहीत नाही.. पालकांचा तर याच्याशी काहीही संबंध नाही.. शिक्षक , निवेदक , गायक ॲक्टर ,साहित्यिक यांनी तरी यावर काम करावं कारण पुढील पिढी त्यांचं अनुकरण करते.. अनेकदा भाषेचा लहेजा आणि भाषाशुद्धी यात गफलत होते.. दोन्ही एकदम वेगळे आहेत..
लहेजा हा त्या गावानुसार बदलतो पण न आणि ण हे महाराष्ट्रात सगळीकडे सारखेच आहेत कारण ती मुळाक्षरे आहेत.. आपण कुठेही शिकलो तरीही यात बदल व्हायलाच नको कारण ते परिमाण आहे.. तीच मराठीची ओळख आहे..
सम्मेलनाचे अध्यक्ष उभे राहिले आणि पहिल्याच वाक्यात सम्मेलनाचा दर्जा कळला.. कारण त्यांना १० वर्षांचा अनुभव होता पण बोलताना त्यांनी अणुभव शब्द वापरला आणि मी इथे का आले असं झालं.. राजकारणी व्यक्ती ज्यानी हे सम्मेलन भरवले होते ते निच्चित म्हणाले त्यांना निश्चित हा शब्दच माहीत नसावा यासारखं दुर्भाग्य काय असावं ना.. इतकी सम्मेलन भरवतो तितकी वर्षे हे करतो हे सांगण्याच्या नादात ते सोणल वहीणी म्हणाले आणि त्याचक्षणी माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले..

दर काही किलोमीटरवर भाषा बदलते पण त्यातील शुध्दता बदलत नाही किवा बदलायला नको .. लहेजा बदलणार आहेच किवा काही शब्दही प्रत्येक ठिकाणी वेगळे असतात तेही मान्य करायलाच हवं पण भाषाशुद्धी बाबतीत कुठलच दुमत असायलाच नको.. अमुक एका ठिकाणची भाषा प्रमाणभाषा होवूच शकत नाही पण न आणि ण तील फरक हा स्थित आणि स्थिर आहे ज्यात बदल झाला तर शब्दांचे बऱ्याचदा अर्थच बदलतात.. बहीणाबाईनी सुध्दा मन हाच शब्द वापरला कारण इथे त्यांनी मण उच्चारलं असतं तर मण म्हणजे धान्य मोजण्याचं माप असा त्याचा अर्थ झाला असता.. शब्दांचे उच्चार आणि त्याचे अर्थ यामध्ये अशिक्षित आणि अडाणी यामध्ये जो फरक आहे तो आहे.. आमचे काहीही अडत नाही किवा पैसे मिळतात ना अशीही उत्तरे आपल्याला मिळतात पण आपण यावर काम केलं तर अधिक प्रगल्भ होवु असा विचार का केला जात नाही.. बहुधा आपण चुकतोय हेच काही जणांच्या लक्षात येत नाही किवा आहे तसच राहु हीच मानसिकता.
डबल पीएचडी कॉलेजमधे लेक्चरर असलेल्या व्यक्तीच्या घरी गेले होते.. निघताना ते मला म्हणाले सोणल पाण खाणार का त्यांना पान म्हणायचं होतं.. इतक्या डीग्रीज असुन त्या व्यक्तीची ही परिस्थिती होती.. हसावं की रडावं खरच कळेना..
जसे हिंदी , संस्कृत किवा इंग्रजी भाषेचे उच्चार नीट यावेत म्हणुन आपण झटतो तसेच आपल्या मातृभाषेसाठी आपल्याला झटायला किवा त्या भाषेच्या शुध्दीसाठी काम करायला हरकत नसावी.. मी म्हणेन माझ्या वाचकांनी यावर जरुर काम करावे.. नाहीतर बाहेर बोलतांना आपली खिल्ली उडवली जाते..आपली भाषा .. आपला अभिमान..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *