नांदेड : दि.१७ शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार व विस्तारित भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई या बाबी लक्षात घेत नांदेड शहरासाठी महानगरपालिकेने अमृत 2 योजनेअंतर्गत तयार केलेल्या 167 कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मान्यता द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय उच्च अधिकार सुकाणू समितीने नांदेड शहरास वाढीव पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिली आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शहरासह जिल्ह्याचा गतीने विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले यातून अनेक विकासाची कामे मार्गी लागले आहेत. राज्यातील सत्ता बदला नंतरही नांदेडच्या विकासाची स्पीड कायम रहावी असा प्रयत्न त्यांचा सुरूच आहे. शहरातील रस्ते ,मलनिःसारण आदी कामे मार्गी लागत असतांनाच शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार व विस्तारित भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई या बाबी लक्षात घेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्देशानुसार मनपाने अमृत -2 अभियानांतर्गत नांदेड शहर पाणीपुरवठा योजना बळकटीकरण व संलग्नीकरणासाठी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावामध्ये नांदेड शहरातील अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करणे त्यासाठीची आवश्यक असलेली साधन सामुग्री खरेदी करणे या बाबी गरजेच्या आहेत. त्यासोबतच विस्तारित शहरामध्ये नव्याने पिण्याच्या पाण्याची यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे असे नमूद केले होते.
या संदर्भातील आवश्यक तो प्रस्ताव नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी मनपाच्या 167 कोटी 64 लक्ष रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस अमृत -2 अंतर्गत तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. त्या नंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी 3 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या वाढीव पाणीपुरवठा योजनेस तत्काळ मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली होती.त्याची फलश्रुती म्हणून राज्य शासनाने या योजनेस मान्यता दिली आहे.त्यामुळे शहराचा झालेला विस्तार व त्यातून वाढीव भागात निर्माण होणारी उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अमृत-2 योजनेअंतर्गत मनपाने दाखल केलेल्या प्रस्तावास मान्यता द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.या मागणीची दखल घेत शासनाने या वाढीव पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिली आहे.यामुळे शहरवासियांचा उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.