फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात , एकजण ठार तर एक गंभीर जखमी..

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर अपघातांची शृंखला सुरूच , आजपर्यंत पाच-सहा जणांनी जीव गमावला तरीपण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमाणीमुळे रस्त्याचे , टोल नाक्याचे , सर्व्हिस रोड व नालीचे रखडलेले अर्धवट काम जैसे थे च..

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य महामार्ग जात असून दत्तगड ते फुलवळ च्या दरम्यान टोल नाक्याचे काम चालू असून ते अर्धवट झाले असून अरुंद ही झाले आहे. तसेच तेथे लाईट ची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नेहमीच अपघात होत असून आजपर्यंत जवळपास पाच-सहा जणांना येथे जीव गमवावा लागला आहे. असाच प्रकार ता.१८ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास घडला असून त्यात एकजण ठार झाला आहे तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

फुलवळ पासून एक किमी.अंतरावर असलेल्या टोल नाका येथे ऑटो पलटी होऊन एक जण जागी ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १८ जानेवारी २०२४ रोज गुरुवारी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास घडली, त्यामुळे फुलवळ गावावर शोक काळा पसरले आहे.

घटनेचे वृत्त आसे की, दिनांक १८ जानेवारी रोज गुरुवारी रात्री १०:०० वाजताचे सुमारास कामाजी मरीबा बनसोडे व २४ वर्षे धंदा मजुरी राहणार फुलवळ व संदीप अर्जुन बनसोडे वय ३३ वर्षे धंदा मजुरी राहणार फुलवळ हे फुलवळ येथून कंधारकडे जातेवेळी ऑटो पलटी होऊन कामाजी मरीबा बनसोडे हे जागीच ठार झाले तर संदीप अर्जुन बनसोडे हे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मयत कामाजी बनसोडे यांचे पश्चात पत्नी, १ मुलगा, आई, भाऊ – बहीण असा मोठा परिवार आहे.

नांदेड ते उस्मानागर , फुलवळ मार्गे उदगीर जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे काम गेली दोन ते अडीच वर्षांपासून चालू असून अद्यापही तो रस्ता पूर्णत्वास आला नसल्याने अनेक ठिकाणी काम अर्धवटच आहे. सदर रस्त्याचे काम करणारी के.सी.एल. कंपनीने ठिकठिकाणी अर्धवट कामे सोडून फुलवळ च्या शेजारी टाकलेला प्लान्ट बंद करून त्या कंपनीने पळ काढला आहे.

प्रशासनाच्या बाजूने सदर रस्त्याचे काम पाहण्यासाठी किंवा ज्यांच्या अधिपत्याखाली हे काम चालू होते व आहे त्या अधिकाऱ्यांना ,संबंधित ठेकेदाराला व राष्ट्रीय महामार्ग च्या कार्यालयाला तसेच या भागातील लोकप्रतिनिधींना अनेक वेळा वारंवार सदर अर्धवट कामाबद्दल व फुलवळ येथील सोडून दिलेल्या एक बाजूच्या सर्व्हिस रोड व नाली बांधकाम हे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी फुलवळ ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले, तोंडी विनंतीही केली. परंतु ” मींया बीबी राजी तो क्या करेगा काजी ” या उक्ती प्रमाणे संबंधित ठेकेदाराला हाताशी धरून त्या अधिकाऱ्यांनी ” आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हरा आधा हमारा ” असे करत आपापली पोळी भाजून घेतली आणि आपल्या मुजोरपणात मनमानी करत येथील सदर काम आहे तसेच अर्धवटच सोडून दिले.

फुलवळ ची जनता तशी जागरूक आहे प्रत्येकाने जमेल तशा पध्दतीने सदर अर्धवट काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न केले , एवढेच नाही तर विविध वर्तमानपत्रातून वारंवार यासंदर्भात बातम्याही छापून आल्या. परंतु मुजोरीचा कळस गाठलेल्या अधिकारी व ठेकेदाराला याचा कसलाच प्रभाव पडला नसून अशा कितीही बातम्या छापून आल्या तरीही आम्ही आमचाच मनमानी कारभार करणार याची प्रचिती दिली. परंतु या गंभीर बाबीकडे ना कोणते वरिष्ठ लक्ष घालतात ना या भागातील लोकप्रतिनिधी यासंदर्भात कोणाला जाब विचारतात. याचे परिणाम भोगावे लागतात ते सर्वसामान्य नागरिकांना.

भविष्यात कधीही अशी भयानक घडू शकते आणि जीवितहानी होऊ शकते तेंव्हा प्रशासनाने वेळीच जागे होऊन सदर रस्त्याचे अर्धवट राहिलेले आणि फुलवळ येथील एका बाजूने राहिलेल्या सर्व्हिस रस्त्याचे व नाली बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *