नांदेड – साहित्य क्षेत्रातील विविध साहित्यकृतींना व इतर क्षेत्रातील मान्यवरांना उज्वल प्रतिष्ठानच्या वतीने २०२३ वर्षाकरिता १२ पुरस्कार जाहीर झाले असून यात विविध साहित्यकृतींसाठी भारत दाढेल, डॉ. आनंद इंजेगावकर, डॉ. सुनील पवार, मोतीराम राठोड, आनंद कदम, डॉ. सुनील पंडित, कमल कदम यांचा तसेच डॉ. दिपाली शेरेकर (वैद्यकीय), अॅड. दीपा सुर्यवंशी ( विधीसेवा), राजेश्वर कांबळे (पत्रकारिता), सुभाष लोखंडे ( सामाजिक), डॉ. विद्याश्री येमचे ( कला) यांचा समावेश आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली. यावेळी पुरस्कार निवड व वितरण समितीचे पदाधिकारी अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, रणजीत गोणारकर, प्रशांत गवळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर यांची उपस्थिती होती.
उज्ज्वल प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी
राज्यस्तरीय उज्वल साहित्यरत्न पुरस्काराने साहित्यिकांना तर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राज्यभरातून मागविण्यात आलेल्या प्रस्तावांतून एकूण १२ जणांची निवड करण्यात आली आहे. साहित्यरत्न पुरस्कारांसाठी भारत मारोतराव दाढेल (किस्ना ) कथासंग्रह, डाॅ. सूनिल श्रीराम पवार, बुलढाणा यांना (सीझर न झालेल्या कविता) कवितासंग्रह, मोतीराम रुपसिंग राठोड, ( आठवणीचं गाठोडं ) स्वचरित्र, डाॅ. आनंद गोविंदराव इंजेगावकर, परभणी ( स्रीमुक्तीच्या युद्धकथा) वैचारिक ग्रंथ, आनंद जांबुवंतराव कदम ( वटभरणाच्या रात्री) कथासंग्रह, कालवश डाॅ. सुनिल धोंडिराम पंडित, परभणी ( अंतरंग मनाचे) कवितासंग्रह, कमल हिरामण कदम, ( आरपार) आंबेडकरी स्वकथन यांची निवड करण्यात आली आहे.
विविध क्षेत्रातील पुरस्कारांमध्ये डाॅ. विद्याश्री शिवाजी येमचे, नांदेड (आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त बाल लावणी कलाकार), सुभाष नागोराव लोखंडे, देगावचाळ, नांदेड ( सामाजिक कार्यकर्ता), डाॅ. दिपाली रमाकांत शेरेकर, नांदेड ( वैद्यकीय) पंचकर्म विभागप्रमुख, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड, राजेश्वर त्र्यंबक कांबळे, कंधार ( दर्पण पत्रकारिता पुरस्कार), अॅड. दीपा रमेशराव सूर्यवंशी, किनवट ( विधीसेवा ) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप पुष्पहार, मानचिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक, मानाचा फेटा व ग्रंथ असे असून लवकरच या मान्यवरांना एका समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येतील; याबद्दल संबंधितांशी प्रतिष्ठानच्या वतीने संपर्क साधण्यात येईल असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर यांनी कळविले आहे.