कुरुळा ( विठ्ठल चिवडे )
कुरुळा सर्कल अंतर्गत नागरिकांचे आरोग्य आणि त्यासाठी कार्यरत असणारी अपुरी यंत्रणा नेहमीच चर्चेचा विषय असते.लोकसंख्येच्या दृष्टीने रुग्णांना म्हणावी तशी रुग्णसेवा मिळत नाही.तालुक्याच्या ठिकाणापासून कुरुळा आणि त्याअंतर्गत येणारी खेडी यातील जास्त अंतरावर असल्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होते.ती थांबवून रुग्णांना योग्य तो उपचार मिळावा यासाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण करण्याची मागणी, नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्याकडे केली आहे.
कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास सेहचाळीस खेड्यांचा समावेश होतो.एकूण पाच उपकेंद्रे परंतु रुग्णसेवेची कायम वानवा असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असून खोळंबा अशी परिस्थिती आहे.गावाची बारा हजाराच्या आसपास असणारी लोकसंख्या आणि परिसरातील जवळपास पन्नास हजार लोकसंख्या यांच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणा अपुरी ठरत आहे.परिणामतः ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात मिळणाऱ्या रुग्णसेवेचा लाभ घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत.जवळपासच्या दुर्गम खेड्यातून कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत उपचारासाठी आल्यानंतर मुबलक यंत्रणा नसल्यामुळे कंधार कडे रुग्णाला रेफर करावे लागते.आशा परिस्थितीत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्राची जीर्ण इमारत,रुग्णसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भौतिक सुविधांचा अभाव,रिक्त पदांची भरती,नेहमीच औषधींचा तुटवडा यासह अनेक बाबींचा सामना येथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना करावा लागतो.जवळपासच्या २० किमी अंतरात एकही मोठे रुग्णालय नाही त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी व लोकसंख्येच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालयाची मागणी एका निवेदनाद्वारे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केली आहे.यावेळी कुरुळा येथील रामकीशन गंगावारे,विनायक कुलकर्णी,डॉ.नलाबले बाजीराव धुळगंडे,बसवेश्वर मठपती,नामदेव मुसांडे,बबर किरपणे यांची उपस्थिती होती.