वातावरण बदलामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत होतेय वाढ ;लहान मुलांसह वयोवृध्दात सर्दी,ताप व अंगदुखी.

कुरुळा : (विठ्ठल चिवडे )

ऋतुमानाचा विचार करता हिवाळ्यात थंडी अपेक्षित असते परंतु वातावरणात होत असलेल्या अचानक बदलामुळे कधी थंडी तर कधी गर्मी तर अचानक दुपारची वाढलेली उन्हाची तीव्रता मानवी शरीरावर विपरीत परिणाम करताना दिसत आहे.होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे ग्रामीण भागात दिवसेंदिवस संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.यावर उपाय म्हणून नागरिक कुठल्याही सल्ल्याशिवाय औषधालयातून औषधी खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

कुरुळा बाजारपेठेचे प्रमुख गाव असल्यामुळे गावात नेहमीच वर्दळ पहायला मिळते.जवळपासच्या खेड्यातून नियमितपणे नागरिकांची रेलचेल असते.यामुळे नागरिकांतील संसर्गजन्य रुग्ण इतर नागरिकांच्या सहज संपर्कात येऊन दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यात प्रामुख्याने दीर्घकालीन सर्दी तसेच खोकला,शरीरात कफ वाढणे,तीव्र व सौम्य प्रकारची डोकेदुखी,ताप, अंगदुखी,घसा खवखवणे, घशातील गाठीवरील सूज आदी प्रकारची सौम्य वा तीव्र लक्षणे लहान मुलांसह प्रौढ व वृद्ध नागरिकांत दिसून येत आहेत.

 

ग्रामीण भागातील शेतकरी ,कामगार यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे माफक दरात उपचार मिळेल यासाठी कुरुळा आरोग्य केंद्रात येत आहेत परंतु काही किरकोळ औषधी वगळता साधे खोकल्यासाठीची मेडिसिन उपलब्ध नसल्याचे समजते.याबद्दल विचारणा केली असता जिल्हा स्तरावरूनच औषधी उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोरगरिबांना उपचार मिळणे अभिप्रेत असते परंतु औषधीच उपलब्ध होत नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्ण खाजगी औषधालयातून औषधी खरेदी करताना दिसत आहेत.अनियंत्रित व अनियमित गोळ्यांच्या सेवनाने नागरिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावणार आहे.

 

कंत्राटी डॉक्टर गुट्टे मात्र कुरुळा आरोग्य केंद्रात औषधी उपलब्ध असल्याचे सांगत आहेत परंतु प्रत्यक्षात रुग्णांना त्याचा लाभ का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तर पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.फरनाझ यांच्याकडे कुरुळा केंद्राचाही केवळ पदभार असल्यामुळे त्या गावात काही जनजागृती करतील का?हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *