कंधार प्रतिनीधी -संतोष कांबळे
अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवेत असलेले जवान महेंद्र बालाजी आंबुलगेकर हे कर्तव्यावर असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून बुधवारी शहीद झाले. जवान महेंद्र अंबुलगेकर यांचे पार्थिव नुकतेच अंबुलगा गावी दाखल झाले. यावेळी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत शहीद जवान अंबुलगेकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंबुलगेकर कुटुंबियांनी यावेळी हंबरडा फोडला. दिनांक ४ फेब्रुवारी दुपारी २ वाजता शहीद जवान अंबुलगेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कंधार शहरातून महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी चौक मार्गे बहाद्दरपुरा फुलवळ येथील नागरिकांनी मानवंदना देवून मुळगावी अंबुलगा येथे आणण्यात आले. फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरवात झाली. अंत्ययात्रेत हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.
अंत्ययात्रा अंबुलगा येथे पोहचल्यानंतर शहीद महेंद्र बालाजी आंबुलगेकर यांच्या पार्थिवास तीन वाजता त्यांचा मुलगा तेजस वय ३ वर्षे याने अग्नी दिली. पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ व कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. शहीद महेंद्र अंबुलगेकर यांना पोलिस प्रशासनातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार राम बोरगावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदित्य लोणीकर, माजी जि.प. सदस्य पुरुषोत्तम धोंडगे, माजी जि.प. सदस्य दशरथ लोहबंदे, काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर आदींनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच लोहा काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद पाटील, शिवसेनेचे भालचंद्र नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, मनोहर पाटील तेलंग, सरपंच माधव मुसळे, विविध पक्षातील पदाधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.