कंधार नगरपरिषद व्यापारी संकुल लिलाव प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक!

 

कंधार :
गेल्‍या १२ वर्षापासून अतिक्रमणात उध्‍वस्‍त झालेल्या कंधारच्या बाजारपेठेची पुन्‍हा एकदा घडी बसविण्‍याची प्रक्रिया जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या पुढाकाराने सुरु झाली असतांनाच या प्रक्रियेस कोणाची नजर लागली कोण जाणे ! सदरच्या नवीन व्यापारी संकुलाची ऑनलाईन पध्‍दतीने लिलाव प्रक्रिया सुरु असतांना अचानक मुख्‍याधिकारी नगर परिषद कंधार यांनी सदरची प्रक्रिया रद्द करून, व्‍यापा-यांना चांगलाच धक्‍का दिला होता.परंतु सदर प्रक्रिया रद्द करण्‍याच्‍या मुख्याधिकारी यांच्या आदेशाविरूध्‍द व्‍यापारी शेख नदीम शेख मगदुम यांच्‍यासह इतर व्‍यापा-यांनी उच्‍च न्‍यायालयाचे दार ठोठावून मुख्‍याधिक-यांच्‍या आदेशाला सध्या स्‍थगिती मिळवली आहे. यामुळे व्‍यापा-यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नांदेडचे तत्‍कालीन जिल्‍हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्‍या कार्यकालात म्हणजेच सन २०१२ मध्‍ये कंधार शहरातील जवळपास ३०० ते ३५० दुकानांची मुख्‍य बाजारपेठ जेसीबी मशीनच्या माध्यमातून अतिक्रमणच्या नावाखाली उध्‍दवस्‍त करण्यात आली. तेंव्‍हापासून सन २०२२ पर्यंत हा विषय जागेअभावी रखडला होता. तत्‍कालीन उपविभागीय अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील यांनी पुढाकार घेवून कंधार नगर परिषदेस शासनामार्फत जिल्‍हा परिषदेची जागा हस्‍तांतरण करून दिली होती.
सदरच्या जागेवर शॉपींग सेंटर बांधकाम करण्‍याचा मुहूर्त लागत नव्‍हता. कंधारच्‍या राजकारणामुळे यास अनेक अडथळे येत होते. यावेळी कंधार तालुक्‍याचे भुमिपूत्र तथा कंधार नगर परिषदेचे तत्‍कालीन मुख्‍याधिकारी विजय चव्‍हाण यांच्‍या पुढाकाराने नविन व्यापारी संकुल बांधकाम करण्‍याचे काम हाती घेण्‍यात आले व त्‍यास यशही मिळाले. इमारत बांधकाम पूर्ण होवून जवळपास एक वर्ष झाले आहे, व्‍यापा-यांना दुकाने कसे वाटप करावे याचा ताळमेळ लागत नव्‍हता.अखेर नांदेडचे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्र‍त्‍यक्ष व्यापारी संकुलाची पहाणी करून लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्‍दतीने करण्‍याची घोषणा करून मुख्‍याधिकारी नगर परिषद कंधार यांच्‍या मार्फत ऑनलाईन लिलाव प्रक्रिया सुरु केली होती.
व्‍यापा-यांनी त्‍यात भागही घेतला होता, सदर ऑनलाईन प्रक्रियेमध्‍ये आता राजकारण येणार नाही व गोरगरीब व्‍यापा-यांना दुकाने मिळू लागण्‍याने कोणाचे पोट दुखले हे कळण्‍याच्‍या आतच मुख्‍याधिका-यांनी सदर प्रक्रियेत गडबड होत आहे, यात नगर परिषदेचे नुकसान होत असल्‍याचा ठपका ठेवून सदर ई लिलाव प्रक्रिया दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी रद्द केल्‍याचा आदेश काढला होता. या आदेशाला व्‍यापा-यांनी उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे रिट याचीका दाखल करून, सदर आदेशाला स्‍थगिती मिळवली आहे.
न्‍यायालयाने पुढील सुणावणीसाठी महाराष्‍ट्र शासनास, जिल्‍हाधिकारी नांदेड व मुख्‍याधिकारी कंधार यांना नोटीस काढली असून त्‍यानंतर याचा अंतीम निर्णय येईल. परंतु तुर्त तरी या व्यापारी संकुलाच्या लिलाव प्रक्रियेस न्यायालयाची स्थगिती मिळाल्यामुळे व्‍यापा-यांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *