परभणीत महासंस्कृती महोत्सवाचे भव्य आयोजन • 7 ते 11 फेब्रुवारी कालावधीत भव्य महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन • परभणीकरांना मिळणार विविध संस्कृतीक कार्यक्रमाची पर्वणी

परभणी : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमितत राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत प्रभावी रितीने पोहोचावी हा या महासंस्कृती मुख्य हेतु आहे. परभणी जिल्हाधिकारी व जिल्हाप्रशासनाच्या वतीने दि. 7 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंत्री- क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बुधवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.

महोत्सवाच्यास पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय किर्तीचा अशोक हांडे आणि 160 प्रथितयश कलावंतांचा सहभाग असलेला कार्यक्रम ‘मराठी बाणा’ यश भव्य दिव्य कार्यक्रमकाची मेजवानी परभणीकरांना मिळणार आहे. देश-विदेशात 2 हजाराहून अधिक प्रयोग सादर झालेला ‘मराठी बाणा’ मराठवाड्यात परभणी येथे प्रथमच सादर होत आहे.

महोत्सवातील दुसऱ्या दिवशी, गुरुवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा समृध्द वारसा अधोरेखीत करणारा कार्यक्रम ‘महाराष्ट्र दर्शन’ होणार आहे. तसेच ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रख्यात विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. याच दिवशी पहिल्या सत्रात, परभणीचा लौकिक वाढवणारे महागायक पं. यज्ञेश्वर लिंबेकर, गोंधळ महर्षी स्व. राजारामबापु कदम परिवार संच, शाहिर प्रकाश कांबळे, परभणी कोरिओग्राफर असोसिअएशनचे सदस्य, गुरुमाऊली कलामंच, परभणी यांचे सादरीकरण तर दुसऱ्या सत्रात विख्यात भारुडरत्न शेखर निरंजन भाकरे यांचे भारुड रंग होणार आहे.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचा अनोखा अविष्कार ‘कलासंगम’ या कार्यक्रमातून सादर होणार आहे. यादिवशी, डॉ.लक्ष्मण देशपांडेंच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या अजरामर एकपात्री प्रयोगाला ज्यांनी पुन्हा रसिकांसमोर सक्षम अभिनयातून आणले असे सुविख्यात अभिनेते मराठवाड्याचे भूमिपुत्र संदिप पाठक हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे.

स्थानिक मान्यवर कलावंतांमध्ये यादिवशी बालगंधर्व कला व क्रीडा मंच, राजीव गांधी युवा फोरम, क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, प्रियभुषण डान्स अॅीकॅडमी गंगाखेड, नागवंशी प्रतिष्ठान, मधुकर कांबळे, रामदास कदम व संच, शुभम म्हस्के, प्रीती भालेराव हे कलावंत आपली कला प्रदर्शित करणार आहेत.

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी, शनिवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दोन सत्रात कार्यक्रम होणार असून, पहिल्या सत्रात, बाजीराव मस्तानी, मौर्य, सारख्या चित्रपटांतून गाजलेले, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे हे ‘लोकरंजनातून लोकप्रबोधन’ विषयावर सादरीकरण करणार आहे. तर दुसऱ्या सत्रात अभिनेत्री स्मृति व ऐश्वर्या बडदे यांचा कुटुंबासह पहावा असा घरंदाज लावणीचा नृत्याविष्कार ‘लावण्यरंग’ सादर होणार आहे.

महोत्सवाच्या समारोपीय पाचव्या दिवशी, रविवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात इंडियन आयडल फेम सुविख्यात गायक राहुल सक्सेनाच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक मान्यवर कलावंत समी सौदागर, प्रांजल बोधक, लक्ष्मी लहाने, पवन पागोटे, आयुष डान्स अॅककॅडमी व बाल विद्या मंदीरचे विद्यार्थी ‘स्वरजल्लोष’ कार्यक्रमातून आपली कला सादर करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात कवी संम्मेलनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या कवि संमेल्लनात मान्यवर पाहुण्या कवीसह स्थानिक सुविख्यात कवी सर्वश्री इंद्रजीत भालेराव, प्रभाकर साळेगावकर, रविशंकर झिंगरे, रेणु पाचपोर, केशव खटिंग, संतोष नारायणकर, नारायण पुरी, बापु दासरी व मधुरा उमरीकर आदींचा सहभागी होणार आहे. यासोबतच जिल्हा क्रीडा अधिकारी व विविध क्रीडा संस्था परभणी यांचे वतीने दररोज सायंकाळी 6 ते 6.30 या वेळेत जिमनॅस्टिक, मल्लखांब, तलवारबाजी, योगा, कराटे, बॉक्सिंग इत्यादी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक रसिकांसमोर सादर केली जाणार आहे.

या सर्व वैविध्यपूर्ण आणि सरस कार्यक्रमांसोबतच सदरील महोत्सवात नागरिक आणि विशेषतः विद्यार्थांसाठी सचित्र शिवचरित्र व शिवकालीन शस्त्रास्त्रांचे, दुर्मीळ वस्तू व नाण्यांचे प्रदर्शन यासह; हस्तकला, गृहउद्योग, महिला बचतगट, पर्यटन विभाग यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवा दरम्यान उपविभागीय परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक व परिवहन विभागा तर्फे विशेष सादरीकरण केले जाईल.

कला व साहित्याच्या क्षेत्रात आपल्या प्रभावी कार्यातून आणि महत्वपूर्ण योगदानातून ज्यांनी परभणीचा लौकिक सर्वदूर वाढवला अशा मान्यवरांचा सन्मान व ऋणनिर्देश करण्यात येणार आहे. यामध्ये सुरमणी पं.डॉ. कमलाकर परळीकर (संगीत), रोहित नागभिडे (संगीत), डॉ. आसाराम लोमटे (साहित्य,) यज्ञेश्वर शास्त्री लिंबेकर (गायन), किशोर पुराणिक (नाटक) यांचा समावेश आहे.

तसेच महोत्सवाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी रसिकांना कूपन्स वितरीत करून त्याद्वारे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तसेच दररोज लकीड्रॉद्वारे किमान पाच भाग्यवंताची निवड करुन, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

या महासंस्कृती महोत्सवाचे भव्य आयोजन व विद्यार्थांसाठी शिव छत्रपतींच्या जीवनमुल्यांचा, राज्यकारभारातील वैशिष्ठ्यांचा, गडकिल्ल्यांचा परिचय देणारी भव्य प्रदर्शनी देखील या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे.

दररोज सायंकाळी 6 ते 10 या वेळेत, शहरातील विष्णु जिनिंग मैदानावर हा संस्कृतीक महोत्सव पार पडणार असून, सर्वांसाठी प्रवेश मोफत असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे सांस्कृतिक समन्वयक तथा अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे व निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली.

परभणीकरांना यानिमित्ताने अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी द्यायची असा मानस असलेल्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी समस्त परभणीकरांनी पाचही दिवस सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *