नांदेडहून लवकरच विमानसेवा सुरु होणार माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले होते सातत्यपूर्ण प्रयत्न

नांदेड – गुरु त्ता गद्दीच्या काळात नांदेड येथील श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळाचे आधुनिकरण व विस्तारीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, जयपूर या ठिकाणी विमानसेवा दिली. परंतु रिलायन्सच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे ही विमानसेवा बंद पडली. परंतु या संदर्भात सातत्यपूर्ण प्रयत्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुरुच ठेवले होते. त्याचाच परिणाम म्हणून आता लवकरच नांदेड येथून विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी विमान तळावरील विमानसेवा मागील कांही वर्षांपासून बंद पडली. या विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडे देण्यात आले होते. विमानतळावरील सेवासुविधा देण्यामध्ये ही कंपनी असमर्थ ठरली. त्यामुळे नांदेड येथून अन्य शहरांशी जोडल्या जाणारी विमानसेवा खंडीत झाली. त्यामुळे या विमानतळाचा विमानसेवा परवाना रद्द करण्यात आला.
या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरळीत सुरु व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. नागरी उड्डायनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांची भेटही घेतली. इतक्यावरच न थांबता कांही खाजगी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांशी त्यांनी प्रत्यक्ष बोलणी केली. दरम्यानच्या काळात विमान प्राधिकरणाने नांदेड विमानतळाचा वाहतूक परवाना पुन्हा बहाल केला.
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी याच संधीचा फायदा घेत महाराष्ट्रातील घोडावत कंपनी संचलित स्टार इअर या कंपनीशी संपर्क साधून ही विमानसेवा नव्याने सुरु करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत स्टार इअरलाईन्सने नांदेड येथून हैद्राबाद, नागपूर व दिल्ली जवळील हिंडन येथे विमानसेवा सुरु करण्याची तयारी केली आहे. येणाऱ्या 20 तारखेपासून ही विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

नांदेड येथे पुन्हा एकदा विमानसेवा सुरु होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून नांदेडला देशातील इतर प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडल्या गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाची निश्‍चित गती वाढेल असा विश्‍वास व्यक्त करतांनाच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नागरी उड्डेयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *