नांदेड जिल्हा परिषदेचा “जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” रमेश पवार यांना जाहीर..

लोहा: विनोद महाबळे

लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (आ.) येथे कार्यरत असलेले उपक्रमशिल प्राथमिक पदवीधर शिक्षक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बहिशाल शिक्षण केंद्राचे व्याख्याते,मराठा सेवा संघ नांदेडचे जिल्हा सचिव, नांदेड जिल्हा बी एड कृती समितीचे जिल्हाध्यक्ष,

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पवार यांचे शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील सक्रिय योगदान पाहून आणि सोळा वर्षांच्या सेवेत त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तावाढीसाठी राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या विविध तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय प्रशिक्षणात त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे.

यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून सातत्याने पर्यावरण शिक्षण,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन,समाज प्रबोधन,कोरोना व्हायरस बद्दल जनजागृती कोरोना व्हायरसाच्या थैमानातील विद्यार्थ्यांचा अभ्यास पालक आणि शिक्षकांची भूमिका, प्रेरक महामानवांच्या चरित्रावर चिकित्सक तर्कशुद्ध पध्दतीने  संशोधनात्मक लेख लिहीलेले आहेत.

अनेक लेखकांच्या पुस्तकांचे अभ्यासपूर्ण समीक्षण केलेले आहे.तसेच शिव,फुले, शाहू,आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी असंख्य व्याख्याने दिलेली आहेत.आज सबंध नांदेड जिल्ह्यात ते एक उत्कृष्ट निवेदक,व्याख्याते,लेखक म्हणून परिचित आहेत.यापूर्वी त्यांना तालुकास्तरीय गुरू गौरव पुरस्कार,

महात्मा जोतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या या शिक्षकाचे कार्य पाहून नांदेड जिल्हा परिषदेने सन २०२०-२१ साठी त्यांची “जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” साठी नुकतीच विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने निवड केली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना सन्मानपुर्वक दिला जाणार आहे.
जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी रमेश पवार यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *