लोकशाहीतील पात्र : प्रगती व विकास

भारत जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा देश. हा देश राम कृष्णाचा देश.या देशाला कुणी बुद्धाचा देश म्हणुन ओळखतात.हा देश महावीर जैनाचा म्हणूनही ओळखला जातो. याच देशात शिवाजी महाराज,महाराणा प्रताप, शाहु,फुले,आंबेडकर,मा.गांधी यांनी जन्म घेतला . भारत हा जसा साधू संताचा देश आहे तसाच शूरविरांचाही देश आहे.येथे विधिवता आहे.येथे अनेक धर्म,जाती, वंश,पंथ,वर्गाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.मोठ्या अभिमानाने आपण सांगतो भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.येथे विविधतेत एकता नांदत आहे. पण सध्याला धर्म,जात यात संघर्ष पेटताना दिसत आहे.जातीधर्मावर राजकारण ठरत आहे.लोकशाहीसाठी हे निश्चितच मारक आहे.

आपला देश स्वातंत्र्याची पंच्याहातरी पूर्ण करित आहे.पंच्याहातर वर्षात काय कमावलो काय गमावलो याची चर्चा जोरात झडत आहे. लोकशाही असलेला जगातला सर्वात मोठा देश. हा संस्कृती संपन्न देश.भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती म्हणून जगात गौरविली जाते.भारत एक विकसनशिल देश आहे.जगातील एक विकसित राष्ट्र होण्यासाठी भारतीयाची धडपड वाखाणन्याजोगी आहे.
लोकशाही म्हटलं की लोकांचा सहभाग, लोकांचे विचार,लोकांचे मत हे महत्वाचे मानले जातात.येथे लोकच राजकर्ते असतात.म्हणजेच लोकांच्या अमूल्य मतावर येथे राजकारभारी ठरतात.त्यांनी लोकसेवक म्हणून कार्य करावे ही संकल्पना येथे रुजावी अशी अपेक्षा ;पण दर पाच वर्षाला एकदा मतदार राजा त्याचं दान मतपेटीत किंवा मतदान यंत्रात दान करतो व तो राजाच्या ऐवजी रंक बनतो.मतदानापूर्वी लोकसेवक म्हणून फिरणारे,भिक मागणारे,मतदार राजांची पाय धरणारे निवडून आल्यानंतर ते राजा बनतात व मतदार राजा रंक बनतो व सेवकांचे पाय धरत असतो.मतदान झाल्यानंतर नेता दान करणाऱ्यास विसरतो.

एकदा निवडून गेल्यानंतर हा राजकारणी नेता हुकूमशहासारखा वागायला लागतो.तो आता मतदार राजाला गृहीत धरूणच आचरण करत आहे.लोकांना विकत घेता येते.प्रलोभणे दाखवून लोकांना फसविता येते.खादी म्हणजे “खा आधी ” हे सूत्र त्यांना पाठ झालेलं आहे. हे सूत्र प्राचीन काळापासून चालत आलेले आहे.आताचे नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे असो आतून सगळे एकच आहेत.वर वर तू तू मी मी करणारे हे सगळेच “आवो चोरो बांधो भारा अधा तेरा अधा मेरा ” करताना दिसत आहेत. मतदाराच्या मताची ते कदर करताना दिसत नाहीत.ते जनेतच्या विचारांची प्रतारणा करून पक्षांतर करत आहेत.वेगवेगळ्या पळवाटा शोधून पक्षाच्या विचारश्रेणीला मूठमाती देवून ते स्वतःच्या हितासाठी व स्वार्थासाठी पक्षांतर करत आहे.त्यांचं हे कृष्णकृत्य पाहून लोकशाही आश्रू ढाळण्यापलिकडे काहीही करत नाही.हे लोकशाहीसाठी मारक आहे.यासाठी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो.येत्या निवडणूकीत लोकांशी, लोकमताशी गद्दारी केलेल्या पुढाऱ्यांना जनता घरचा रस्ता निश्चित दाखवितील का ? हे येणार काळचं ठरवेल.

आजच्या आपल्या नेत्यांनी लोकशाहीची थट्टा मांडलेली आहे.ढोंगी नेत्याच्या विचारानुसार लोकशाही म्हणजे “लोकांचा सहभाग नसलेली,लोकांपासून दूर गेलेली व लोकांना सहज विकत घेता येणारी शासन प्रणाली.”अशी केलेली आहे.आपण मतदारही राजकारण्याचा भुलथापाना बळी पडत आहोत. सध्याच्या राजकारणात राजकारण करणारे लोक , नेतेमंडळी अनेक प्रलोभणे दाखवित आहेत. अमुक गोष्टी आम्ही मोफत देवू.तमूक गोष्टी या या समाजाला देण्यात येईल.अनेक सवलती व वस्तू मोफत वाटून गरिबांना ते लाचार बनवित आहेत. आधिकच गरीब बनवित आहेत ? गरीबांची काम करण्याची शक्तीच ते कमकुवत बनवत आहे. मोफत मिळविण्यासाळी ते नेहमी त्यांच्या मागे पुढे फिरत रहावे असे नेत्याना वाटत असावे. शिक्षणापासून ही गोरगरिबांना दूर ठेवण्यासाठी सरकारी शाळांकडे दुर्लक्ष व कायम विनाअनुदानित शाळांचं पिक फोफावत आहे . सामान्य माणुस या धूर्त कपट कारस्थानाला बळी पडताना दिसतो.

येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जर्मन देशाचा हुकूमशहा हिटलर हा वर्णद्वेषी होता.आर्य हेच उच्चवर्णाचे आहेत असा त्याचा समज होता.या हुकूमशाहाने एक सुंदर कोंबडा पाळलेला होता.कोंबडा त्याचा भलताच लाडका. त्या कोंबडयाला तो खाण्यास भरपूर देत असे. कोंबडा आता विसरून गेला की त्याला घराबाहेर फिरून स्वतःच्या कमाईवर पोट भरता येते हे तो ठार विसरून गेला.तो लालची बनला.तो आळशी बनला. घराबाहेर पडत नव्हता तर हिटलरच्या मागंपुढं करत राहयाचा.लालच का फल बुरा होता है ! हे तो चक्क विसरून गेला.त्यातला स्व मरून गेला.उरली फक्त लाचारी.

हुकूमशहा हिटलर याला आता पूर्ण कळालं होतं की हा कोंबडा आता कुठही बाहेर जाणार नाही .दुसऱ्यासोबतही जाणार नाही. आता तो त्या कोंबडयाला जवळ घेवून त्याचे एक दोन एक दोन पिसं दररोज उपटून काढू लागला. कोंबडा लाचार.फुकटचं खायाला मिळतय म्हणून हिटलरच्या कृतीकडे तो डोळेझाक करत राहीला. हळूहळू कोंबडयाची पिसं सर्व काढून टाकले तरी तो लाचार कोंबडा हिटलरच्या मागे मागे फिरत राहीला.कधी कधी तो हिटलरबरोबर त्याच्या संसदेत गेला पण लाचार म्हणूनच.आपल्यावर अशी वेळ येवू नये म्हणून सर्वजण सावध होवू या.
आपल्या येथेही ” फु ” संस्कृती जोरात फोफावत आहे.सर्वपक्षीय नेते हे काम जोमाने करत आहेत.गरिबाला गरीब बनवत आहेत. आलीकडचे राजकारणी, सत्ताधारी तर जाहिरपणे सांगत आहेत की या देशाची जी प्रगती झाली, ते केवळ आमच्यामुळेच.साठ वर्षात जे झाले नाही ते दहा वर्षात झाले.उन्हाळा,पावसाळा,हिवाळा हे केवळ आमच्यामुळेच हे आम्हीच तयार केलोत. मुलाने आई बापाला विचारावे तुम्ही माझ्यासाठी काय केलात ? मायबाप काय उत्तर देणार ? पण मुलांने विसरू नये की त्यांच्यामुळेच हे सुंदर जग पाहयाला मिळालेलं आहे.

आजचं राजकारण तर येवढं गच्चाळ झालेलं आहे की येथील राजकारणी,नेतेमंडळी यांनी नितीमुल्यांचं विसर्जन गंगेत केलेलं आहे. राजकारणी मंडळी आता ऐकमेकांची प्राण्यांबरोबर तुलना करत आहे.यांचं बोलणं ऐकून ते प्राणी किती दु:खी झालेले असतील ? हे देव जाणे. सध्याला कोणी गाढव,बैल ,लांडगे, कोणी शेळी , बोका , उंदीर , वाघ ,कोल्हा,हरण तर कोणी सिंह याच्याशी तूलना करून या प्राण्यांची काहीही चूक नसताना या बिचारांचं अपमान करत आहेत. हे असं का करत असावे ?तर मतदार राजाच्या करमणुकीसाठी ?नाही. हे करत आहेत त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी.

लोकशाहीत मतदार ” राजा ” आहे. लोकांच्या मताची किंमत व कदर झाली पाहिजे. राजकारणात नितिमुल्य जपली पाहिजे म्हणणारे रातोरात पक्ष बदलत आहेत.दिवसभर एका पक्षात काम करून सकाळी पक्ष बदलत आहेत.सत्ताधारी पक्ष ज्या नेत्यावर हजारो कोटीचे भ्रष्टाचार केले म्हणून आरोप करतात त्यांनाच त्यांच्या पक्षात सामिल करून घेत आहेत सन्मानाची पदे देत आहेत.राजकारण लबाड ढोंगी,भ्रष्टाचारी आपमतलबी,बनवाबनवी करणाऱ्या लोकांची टोळी झालेली आहे. सगळेच राजकारणी मु मे राम बगल मे छुरी असे वागत आहेत. एक दोन तत्वाचे राजकारण करणारे असतील व आहेत पण लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते ना.
सामान्य जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी पहात आहे.त्यांनाही आता राजकारण कळत आहे.निश्चित आज किंवा ऊद्या या ढोंगी, द्वेषी नेत्यांना मतदार मायबाप घरचा रस्ता दाखविणारच आहे. प्रत्येक व्यक्तीची,घटनांची वेळ ठरलेली आहे.ती येण्यास थोडं मागे पुढे होईल.

लोकशाहीत सध्याच्या घडीला दोन मजेदार पात्र फारच प्रिय झालेले आहेत.हे दोन पात्र म्हणजे विकास आणि प्रगती. ही दोघंही आजच्या नेत्याला फारच प्रिय आहेत.आजचे सत्ताधारी असो की विरोधी हे वरील दोघांना घेवून प्रत्येक सभेत फिरत आहेत.विकास नेत्याच्या खांद्यावर तर प्रगती कडेवर बसलेली असते. प्रत्येक नेता आज घसा ओरडून सांगत आहे ही प्रगती व विकास केवळ माझ्यामुळेच झालेलं आहे.पण जनतेलाही आता कळालेलं कोण किती विकास व प्रगती केलेले आहे.विकास देशात फिरताना वेगवेळे रुप धारण करून फिरत आहे.तो उद्योगपतीकडे फिरताना सवलीतीचे बारदाने भरून घेवून जात आहे.त्यांना सगळया सोयी पुरवत आहे.त्याचीच काळजी तो घेत आहे.प्रगती ही विकास सोबत आहे.दोघंही मिळून ते उद्योगपती,कारखानदार यांची काळजी घेत आहेत. जेव्हा ते सामन्य नागरिकात फिरत आहेत.तेंव्हा दोघांच्याही हातात भिक मागण्याचं कटोरा घेतलेला आहे.ते भिक मागत फिरत आहेत.हातातील कटोऱ्यातून ते आश्वासनाचं पाऊस पाडत आहेत. हा बघा विकास तुमच्या दारात आलाय.विकास आलाय म्हणजे सोबत प्रगती आणली आहे.मतदार राजा या विकास आणि प्रगतीकडे पहा.ही लोकशाही आहे.नेता तुमचा मालक नाही सेवक आहे.तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागून घ्या.अशी संधी पाच वर्षातून एकदाच येते ही संधी सोडू नका.प्रत्येक निवडणूकीत विकास आणि प्रगती ही प्रत्येक शहरातील झोपडपट्टीत,ग्रामीण भागात फिरत असतात.
मायबाप मतदार राजा आता तरी प्रगती आणि विकास यांच्या भूतथापानां बळी पडणार? भूलथापांना बळी पडू नका. स्वार्थी दल बदलू या नेत्यापासून सावध राहून लोकशाही वाचवा.लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी स्वतःच पवित्र असं मतदान जातपात,धर्म,वंश व पैसाकडे न पहाता,त्याच्या पलिकडे जावून योग्य लायक व्यक्तीला तुमचं “पवित्र दान ” करा.येवढं पवित्र काम कराल का?
आजच आपण निश्चय करू या.लोकशाही जीवित ठेवण्यासाठी प्रत्यकांनी प्रलोभणाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करू या .

 

राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *