भाजपा नांदेड लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालय 24 तास राहणार खुले ; धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांची माहिती

 

भाजपा लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालय सुरू होणाऱ्या दिवसापासून ते निवडणूक संपेपर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार होण्यासाठी प्रचार कार्यालयातच मुक्काम ठोकून २४ तास प्रचारासाठी देणार असल्याची माहिती नांदेड लोकसभा कार्यालय प्रमुख तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते एसटी महामंडळात कार्यरत होते. टी.एन.शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त असल्यामुळे आचार संहिता एकदम कडक होती. मित्र प्रकाशभाऊ खेडकर यांचा प्रचार तर करायचा होता पण नोकरीवर गडांतर येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यामुळे प्रकाशभाऊ यांच्या घरीच तब्बल ४० दिवस मुक्काम ठोकून निवडणुकीचे नियोजन केले. त्यानंतर १९९९,२००४ च्या विधानसभा निवडणुकीत आणि डी. बी. पाटील खासदारकीला उभे होते तेव्हा दिलीप ठाकूर यांनी संपूर्ण कालावधीत प्रचार कार्यालयातच मुक्काम केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील खा. चिखलीकर यांच्या प्रचारार्थ ३५ दिवस गोदावरी हॉटेलच्या प्रचार कार्यालयात तळ ठोकला होता. यावेळी देखील खा. चिखलीकर, भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख यांनी दिलीप ठाकूर यांच्यावर नांदेड लोकसभा कार्यालय प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये आल्यामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि नांदेडचे खासदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर हे प्रचंड मताने निवडून येणार यात कोणतीही शंका नाही. निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर आपले देखील योगदान असावे यासाठी दिलीप ठाकूर यांनी पूर्णवेळ प्रचार कार्यालयात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे भाजप परिवारातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *