नांदेड ; प्रतिनिधी
होळीनिमित्त सतत २२ वर्षापासून सुरू असलेल्या महामूर्ख कवी संमेलनाला यावर्षी जागा बदलल्यानंतर देखील अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असून झी हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे व इतर कवींनी रसिकांना शृंगार गीते ऐकवून मनमुराद हसविले.
होलीका उत्सव समिती व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्यातर्फे नवा मोंढा येथील हळदी लिलाव शेडमध्ये कवी संमेलन रविवारी रात्री घेण्यात आले. चित्रपट निर्माते कुणाल कंदकुर्ते,प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंद शर्मा, भोकर येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप उत्तरवार, उद्योजक एकनाथ टेकाळे देगलूर यांनी दोन गदर्भराज व एका छक्क्याला हार टाकून कार्यक्रमाची सुरुवात केली.या आगळ्यावेगळ्या उद्घाटनाला रसिकांनी प्रचंड दाद दिली.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक जयसिंग हंबर्डे,पोस्ट अल्पबचत संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन शिवलाड , अक्षय रावत, अखिल गुप्ता, नागेश शेट्टी,रुपेश वट्टमवार, शिवाजी इबितवार, आनंद राठी, सुमेर राजपुरोहित, सिद्राम दाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य संयोजक जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे , संयोजन समिती सदस्य राजेशसिंह ठाकूर, शिवा लोट, कामाजी सरोदे,शिवाजी पाटील,सुरेश शर्मा,अरुण काबरा यांनी अतिशय चोख व्यवस्था केली होती. प्रमुख अतिथी यांचा जोकर टोपी घालून सत्कार करण्यात आला. कार्टूनचे मास्क घालून कवी व्यासपीठावर आले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाट झाला.
कवी अशोक कांबळे यांनी काव्यपठनाला चांगली सुरुवात केली.यवतमाळ येथील वसंतराव इंगोले यांनी नाकातून बासरी वाजवून दाखवल्यामुळे सर्वजण चकित झाले.कटनी मध्यप्रदेश येथील सरदार शानूसिंघ यांनी द्विअर्थी रचना सादर केल्या.उत्तर प्रदेशचे तिरपट इलाहाबादी यांनी अफलातून विनोद सांगितले. पुणे येथील प्रा. रवींद्र अंबेकर यांचे नॉनव्हेज जोक ऐकून सर्वांची मस्त करमणूक झाली.पत्रकार राजेंद्र शर्मा यांची दादा कोंडके टाईप कविता भाव खावून गेली.लातूर येथील योगीराज माने यांची श्रृंगालिक लावणी सर्वांना आवडली.अकोला येथील विनोद सोनी यांच्या मिश्किल विनोदाला चांगला प्रतिसाद मिळाला.
सर्वात ज्येष्ठ कवी भोपाळचे धूमकेतू यांनी आपल्या काव्यातून अशी रंगत भरली की, ” बंदर कितना भी बुढा हो जाये,कोलांटी उडी मारना नही भुलता ” याचा प्रत्यय आला. झी हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे यांनी एकापेक्षा एक सरस पॅरोडी गीते सादर केली. या रचना ऐकताना रसिकांनी नृत्य करत प्रचंड दाद दिली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी देखील होळीच्या हास्य रसाचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचलन “चला हवा येऊ दे ” फेम सतीश कासेवाड यांनी अतिशय सुंदर केले.
कार्यक्रमाला सुरेश लोट,धीरज स्वामी, तिरुपती भगनुरे, राजीव मिरजकर, ओमप्रकाश मानधने, सतीश बेरुळकर, संदीप छापरवाल, महेंद्र तरटे,गौतम सावने , डॉ.अजयसिंग ठाकूर यांच्यासह शेकडो रसिक उपस्थित होते.त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, तेलंगाना, पश्चिम महाराष्ट्रातील दर्दी श्रोत्यांचा समावेश होता.पुढील वर्षी महामूर्ख कवी संमेलन मोकळ्या जागेत करण्यात येणार असल्याची माहिती धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
बनारस आणि नांदेड या दोनच जागी वयस्कांसाठी होळीचे कवी संमेलन आयोजित करण्यात येत असून वर्षभर कोंडलेल्या भावनांना वाव देण्याची संधी मिळाल्यामुळे रसिकांनी समाधान व्यक्त केले.
(छाया: करणसिंह बैस, सचिन डोंगळीकर, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, धनंजय कुलकर्णी)