लेखकाचा सन्मान हा उत्सव नव्हे तर ती एक आत्मचिंतनाची संधी होय – श्रीकांत देशमुख यांचे प्रतिपादन : होळीच्या आनंदात देविदास फुलारी यांचा सन्मान सोहळा थाटात

 

नांदेड : कोणत्याही लेखकाचा झालेला सन्मान हा उत्सव नसून ती एक आत्मचिंतनाची संधी होय . कारण तो सन्मान मिळाल्यानंतर त्या त्या लेखकावर मोठी जबाबदारी पडलेली असते . कोणत्याही राष्ट्रपुरुषांच्या नावाने दिला गेलेला सन्मान हा त्या राष्ट्रपुरुषाच्या विचाराच्या वाटेवर आपल्याला नेऊन ठेवणार आहे. मात्र ज्या राष्ट्रपुरुषांच्या नावाने आपणास सन्मान देण्यात आला त्या राष्ट्रपुरुषांनी केलेली कामे आणि त्यांचें लोकोत्तर कार्य दृष्टीसमोर ठेवून आपण आत्मचिंतन करून तशी जबाबदारी स्वीकारणे म्हणजे लेखकाचा सन्मान होय असे परखड मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी आज व्यक्त केले.

नांदेड येथील ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक ,कादंबरीकार देविदास फुलारी यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले होते . त्यानिमित्त ललित कला प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने विसावा पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या फुलारी यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी इबितदार यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. शंकर विभुते , कथाकार दिगंबर कदम, प्रा. महेश मोरे , ललित कला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गजानन मुधोळ पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

विश्वास अंबेकर यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर गजानन मुधोळ पाटील यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते देविदास फुलारी यांचा सन्मान करण्यात आला. व्यंकटेश चौधरी लिखित मानपत्राचे वाचन प्रा. धाराशिव शिराळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले.
यावेळी बोलताना श्रीकांत देशमुख म्हणाले की , जे लेखक स्वतःला परिपक्व समजत असतात ते लेखक म्हणून संपलेले असतात. त्यामुळे लेखकाने कधीही आपल्याला परिपक्व समजू नये . लेखक सतत असमाधानी राहिला पाहिजे. त्याला आत्मचिंतन करता आले पाहिजे. खरंतर उद्योजक साहित्यिक झाला पाहिजे मात्र साहित्याचा उद्योग करणे चुकीचे आहे आणि जे साहित्याचा उद्योग करतात अशा लोकांना आपण जवळ येऊ देऊ नये.

असे आवाहन करतानाच लेखक होणे म्हणजे तुकोबा होण्याची प्रक्रिया असते. लेखक होणे म्हणजे तथागत भगवान बुद्ध होण्याची प्रक्रिया असते. लेखक होणे म्हणजे नवनिर्मितीची प्रक्रिया असते त्यामुळे लेखक होणाऱ्याने आत्मभान ठेवून लिखाण केले पाहिजे.जेंव्हा साहित्यिक म्हणून एखाद्या पुरस्काराने आपले नाव महापुरुषाशी जोडले जाणे ही आपली जबाबदारी वाढवणारी गोष्ट असते . कारण महापुरुषांच्या नावाने मिळालेला सन्मान हा केवळ आनंद उत्सव नसतो तर त्या महापुरुषांचे विचार अंगीकारून त्यांचे विचार पुढे नेण्याची एक नवीन जबाबदारी आपल्या खांद्यावरती पडलेली असते . ही जबाबदारी आता देविदास फुलारी यांच्या खांद्यावरतीही आलेली आहे .

त्यामुळे देवीदास फुलारी यांनी आत्मचिंतन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराची उंची वाढवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समाजाच्या उभारणीसाठी काही नवनिर्माण करता येईल का? या अनुषंगाने काम करावे असेही त्यांनी सुचित केले. यावेळी बोलताना देशमुख पुढे म्हणाले की, एखाद्या गावाचा , जिल्ह्याचा आणि राजाचा सांस्कृतिक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणे ही साहित्यिकांची जबाबदारी असते . किंबहुना साहित्यिकांमुळेच सांस्कृतिक चेहरा तयार झालेला असतो. कोणत्याही राजकारण्याला आपल्या देशाचा, राज्याचा ,गावाचा सांस्कृतिक चेहरा तयार करता येत नाही.

 

यशवंतराव चव्हाणांसारखा अपवाद वगळता बहुतांशी राजकारण्यांना ही कामे जमली नाहीत मात्र लेखकाने ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. दुःखाचा शोध घेऊन इतरांच्या दुःखात आपले दुःख शोधणे किंवा इतरांचे दुःख कमी करण्यासाठी लिहिणे ही लेखकांची खरी जबाबदारी आहे . कारण लेखक हा समाजाला बळ देण्याचे काम करीत असतो. त्याच्या साहित्यातून समाजाला बळ देता आले पाहिजे. समाजाला नव संजीवनी देण्याचं काम त्याला करता आले पाहिजे. लेखकाला मारण्याचे काम अलीकडच्या काळात काही लोक करीत आहेत मात्र लेखकाला आणि त्याच्या विचाराला मारता येत नाही. या परिस्थितीची चिकित्सा करता आली पाहिजे आणि जी माणसं चिकित्सा करतात त्यांना वाईट ठरवल्या जाते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे .

 

परंतु लेखक आणि कवीने आता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली पाहिजे .कारण वर्तमान परिस्थिती अत्यंत विदारक आहे . हे भान ठेवून आता लिहिते होण्याची गरज आहे . सार्वजनिक नीतिमत्ता जपण्याचे काम केवळ लेखकांकडून होत आहे आणि हे काम इतरांनी करावे यासाठी आपल्या लेखण्या झिजवाव्या लागतील यासाठी साहित्यिकांना मध्ये निर्माण झालेले कळप संपले पाहिजेत असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सन्मानला उत्तर देताना देविदास फुलारी म्हणाले की , हा सन्मान माझे एकट्याचा नाही तर नांदेड जिल्ह्यातील तमाम साहित्यिकांचा आणि नांदेडच्या मातीचा सन्मान आहे. मला माणसं वाचता आली . समजून घेता आली. माणसात राहता आलं .त्यामुळे माणसांसाठी मिळालेला हा सन्मान खऱ्या अर्थाने मानवतेला अर्पण करतो अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रा. महेश मोरे , डॉ. शंकर विभुते , दिगंबर कदम आणि डॉ. पृथ्वीराज तौर यांची यावेळी समायोचीत भाषणे झाली. बालाजी इबितदार यांनी अध्यक्ष समारोप केला . यावेळी नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जातीअंताचा लढा लढणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांकडून जातीयता : पृथ्वीराज तौर

अनेक राष्ट्रपुरुष आणि समाजसुधारकांनी जातीअंताचा लढा लढून खऱ्या अर्थाने देशातील जात संपुष्टात आणण्याचा आणि सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय . मात्र हीच विचारसरणी अंगीकारून आपण पुरोगामी असल्याचे ढोंग करत काही तथाकथित पुरोगामी लोक जातीअंताच्या लढ्याच्या नावाखाली जातिवाद पसरवित आहेत . ही बाब साहित्य चळवळीसाठी आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक असल्याने अशा विचारवंतांनी , लेखकांनी , साहित्यिकांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे परखड मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पृथ्वीराज यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *