नांदेड-
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना गोंडवाना विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. त्यांनी ” सिरोंचा आणि दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील तेलगू भाषेचा सांस्कृतिक सामाजिक प्रभाव व सिरोंचा येथील ऐतिहासिक महत्व” या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
यासाठी त्यांना प्रा.डॉ. सुधीर भगत यांचे मार्गदर्शन लाभले. हा प्रबंध गडचिरोली विद्यापीठातील सर्वात मोठा प्रबंध असल्याचे राठोड यांनी सांगितले. हा प्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांनी जवळपास शंभर गावांना भेटी देऊन येथील नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा केली.
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात सेवा करत असताना हा शोधप्रबंध सादर करणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. परंतु मार्गदर्शक डॉ. सुधीर भगत, तत्कालीन पोलीस अधीक्षक, स्थानिक पत्रकार व सहकाऱ्यांच्या मदतीने मला हा शोधप्रबंध पूर्ण करण्यात मदत मिळाली असल्याची भावना अति.पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी व्यक्त केली.
अति. पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, विशेष पोलीस निरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अभिनंदन केले.