नांदेड :- संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार 2022 पासून 2 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन (World Autism Awareness Day) साजरा केला जातो. त्याचप्रमाणे मंगळवार 2 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास उपसंचालक डॉ. अर्चना वसंतराव भोसले, डॉ लक्ष्मण देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, आरएमओ डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. विद्या झिने, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, डॉ. एच के साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. उमेश मुंडे, मेट्रन सुनिता राठोड, जिल्हा डीईआयसीचे समन्वयक विठ्ठल तावडे, डॉ.श्वेता शिंदे, मानसशास्त्रज्ञ श्रीमती शीतल उदगीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मेंदूरोग तज्ज्ञ डॉ मारोती कदम यांनी ऑटिझम या आजाराविषयी माहिती दिली. ऑटिझम म्हणजेच स्वमग्न असा त्याचा अर्थ आहे. स्वमग्न हा एक मानसिक आजार असून 2 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये हा आजार दिसून येतो. या प्रकारच्या आजारामध्ये बालकांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही. यामुळे मुलांचा मेंदू संकुचित होतो. मुल कुटुंब आणि मित्रापासून दूर राहू लागतात असे त्यांनी सांगितले.
या आजारासंबंधित लक्षणे, बालकांसाठी घ्यावयाची काळजी व उपचार पद्धती याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
ऑटिझमची लक्षणे (Autism Symptoms)
स्वमग्न असलेली मुले इतरांशी पटकन नजर मिळवत नाहीत. ते त्यांच्याच विश्वात हरवलेले असतात. अशा मुलांना भाषा शिकण्यास अडथळे निर्माण होतात. कोणाचा आवाज ऐकून प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. सामान्य मुलांपेक्षा ही मुल वेगळी दिसू लागतात. जर तुमचे मूल नऊ महिन्यांचे असेल आणि हसत नसेल किंवा नीट लक्ष देत नसेल तर ही ऑटिझमची लक्षण असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
‘संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार 2022 पासून 2 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता
लक्षणे दिसू लागल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. मुलाशी चांगले वागा. मुलाला खेळण्यासाठी साधी खेळणी द्या. मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. मुलाची नेहमी नवीन लोकांशी ओळख करून द्या. मुलाला मैदानी खेळ खेळायला लावा आणि मुलाचा आत्मविश्वास थोडा वाढू द्या. फोटो द्वारे मुलाला गोष्टी समजावून सांगा. मुलाच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्या.
ऑटिझमचा उपचार
मुलांची स्थिती पाहून काय उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात. बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, इत्यादी थेरपी त्याच्या उपचारात केली जाते. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC)
जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राची स्थापना केलेली आहे. जर एखाद्या पालकांना आपल्या बालकांमध्ये वरील प्रकारचे कोणतेही लक्षणे आढळून आली अशा पालकांनी आपल्या बालकांची त्वरित तपासणी व पुढील उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पिंपळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व सुनील तोटेवाड यांनी परिश्रम घेतले.