कंधार /प्रतिनिधी
माजी आमदार व माजी खासदार दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर तळागाळातील व आठरा पगड जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.भाईंनी शैक्षणिक संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या मूलांना मोफत शिक्षण मिळवुन दिले.त्याकाळात शिक्षणाची सोय करुन शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली.भाईंची ही क्रांतिकारी चळवळ आजच्या तरुणांनी पुढे चालू ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक गवते यांनी केले.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दि. ९ मे रोजी महात्मा बसवेश्वर आणि शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.द्वादशभूजादेवीचा अभिषेक करून सकाळी सात वाजता श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बहाद्दरपुरा येथुन शोभायात्रा काढण्यात आली. बहाद्दरपुरा येथील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही शोभायात्रा कंधार मधील गांधी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
येथे शोभायात्रेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक गवते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर, सदस्य प्रा. शंकरराव आंबटवाड,प्राचार्य डॉ.सुर्यकांत जोगदंड, प्राचार्य डॉ.धर्मापुरीकर,माजी मुख्याध्यापक व्हि.जी.चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे सदस्य गुरुनाथ पेठकर, उत्तम भांगे यांच्यासह संस्थेच्या विविध शाखेतील मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, कर्मचारी वर्ग, विविध शाखांचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासहेब आंबेडकर, महाराणा प्रतापसिंह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ही शोभायात्रा सिद्धार्थ नगर मार्ग शांतीघाट बहाद्दरपुरा येथे पोहचली. तेथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
****-