नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज दि. १९ मे रोजी ‘पौर्णिमोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच विविध धम्मविधी संपन्न होणार असून या कार्यक्रमाला आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रो. डॉ. भास्कर दवणे, भूतान धम्माभ्यास दौऱ्याहून परतलेले बौद्ध उपासक उपासिका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली.
खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्येक महिन्याच्या १९ तारखेला पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात परित्राणपाठ, सूत्तपठण, गाथापठण, त्रिसरण पंचशील, अष्टशील, दसशील ग्रहण, त्रिरत्न वंदना, ध्यानसाधना, ध्वजारोहण, बोधीपूजा, धम्मदेसना, आर्थिक दान, फलदान, भिक्खू संघास आणि उपासकांना भोजनदान, बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. डॉ. भास्कर दवणे यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ भिक्खू संघास व सर्व उपस्थितांना भोजनदान देण्यात येणार आहे. तसेच भूतान धम्माभ्यास दौऱ्याहून परतलेल्या उपासकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपासक उपासिकांचा होणार सत्कार
कार्यक्रमाच्या दरम्यान भूतान धम्माभ्यास दौऱ्याहून परतलेल्या उपासक उपासिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या दहा दिवसांच्या दौऱ्यात भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह राजेंद्रकुमार टोके, पद्मीन सदावर्ते, शारदा थोरात, सुप्रिया पेडगांवकर, सुमन पंडित, नागोराव कोकाटे, शिला कोकाटे, कल्पना घोगडे, चंद्रकांत पंडित, वंदना पंडित, राजश्री सूर्यतळ, शिवगंगा वाटोडे, बापुराव वाटोडे, कमल सूर्यतळ, गोविंद सूर्यतळ, ज्ञानेश्वर घोडगे, नाथा पंडित हे बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले होते.