कंधार ; दिगांबर वाघमारे )
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी अंध व्यक्तींना नवदृष्टी मिळवून देण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास जात असून सात दिवसात शहरासह तालुक्यातील ५५ विविध गाव वाडी तांड्यावर मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात ४५ हजार रुग्णाची तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात एक हजार ५०० वयोवृद्धांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानात आता पर्यंत एक हजार ५०० वृध्दांवर मोफत यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कंधार – लोहा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात यशस्वीपणे मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे सामाजिक काम श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांनी हाती घेतले आहे.
दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर तळागाळातील आठरा पगड जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केले. गोर – गरिब, दीन – दलितांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर झटले व त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांचा सामाजिक कार्याचा वसा व वारसा त्यांचे पुत्र प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे पुढे चालवत असून ता. १९ ते २६ मे दरम्यान फुलवळ, बहाद्दरपुरा सर्कल मधील गावागावात वाडी, तांड्यावर व कंधार शहरात प्रत्येक शिबिराला प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांनी भेट देऊन वयोवृद्ध व्यक्तींना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
त्यांच्या आवाहनाला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला.