कंधार आगारातील वाहकास प्रवाशाकडून मारहाण सरकारी कामात अडथळा … नवीन फौजदारी कायद्यानुसार कंधारमध्ये पहिला गुन्हा दाखल…

 

कंधार : प्रतिनिधी

 

कंधारमध्ये बस वाहकास मोफतचे कार्ड असून तिकिटाचे पैसे का मागतोस असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात नवीन फौजदारी कायद्यानुसार विविध कलमान्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशामध्ये सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले. नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला . याबाबत अधिक माहिती अशी की, ३ रोजी कंधार आगारातून बस क्रमांक एम एच २० बी एल १७३८ चालक व्यंकट डांगे यांनी सकाळी साडेसात वाजता घोडज, संगमवाडी, उंमरज मार्गे जाऊन परत प्रवासी घेऊन येत असताना ९.५० वाजता पाताळगंगा पाटी येथून बस मध्ये बसलेल्या प्रवासी सूर्यकांत माणिका किरतवाड रा. पातळगंगा यास तिकीट घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याचे आधार कार्ड दाखवून मोफतचे तिकीट देण्यास सांगितले वाहकास शंका आल्याने त्याने ते आधार कार्ड तपासले असता ते मोफतच्या नियमात बसत नसल्याने वाहकाने त्यास पुर्ण तिकीट घेण्यास सांगितले. तेव्हा त्या प्रवाशाने बस काय तुझ्या बापाची आहे का? सवलत देणारे वेडे आहेत का? असे बोलून वाहक संतोष अरुण कंधारे यास शर्ट धरून शिवीगाळ आणि थापड बुक्क्यांनी मारहाण केली.

सदरची घटना चालक व्यंकट डांगे व प्रवाश्यांनी सोडवा सोडवा केली. सदरील घटना पातळगंगापाटीपासून दोन किलोमीटर जवळ असलेल्या काशीराम तांड्या जवळ घडली आहे. याप्रकरणी वाहक संतोष अरुण कंधारे यांच्या तक्रारीवरून नव्या कायद्यानुसार कंधार पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१(१), ३५२ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे नवीन फौजदारी कायद्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ बी एम व्यवहारे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *