मागणें ते आम्हा नाहीं हो कोणाशी।* पंढरीची वारी विशेष

 

 

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, चला माऊली, चला माऊली ज्ञानबा ,तुकाराम ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत वारकरी देहभान विसरून पंढरीच्या दिशेने निघाले आहेत त्यांच्या मुखात, पाहू द्या रे मज विठोबाचे रूप। लागलीसे भूक डोळा माझ्या।।असे म्हणत अंत:करणातून विठुरायावर प्रेम करणारे लाखो वारकरी गावागावातून पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामध्ये शेकडो जातीची वारकरी एकत्रित येऊन राष्ट्रीय एकात्मता दर्शवल्याने सर्वत्रच सलोख्याचे व सौहार्दाचे वातावरण तयार झाले आहे. कितीतरी दिंड्या व पालख्या मधून संताच्या अंभगाचे गोड आवाज कानी येत आहेत.

अवघे गरजे पंढरपुर । चालला नामाचा गजर। टाळ घोष कानीं येती। ध्यानी विठ्ठलाची मूर्ती।खरोखरच या पृथ्वीतलावर असणारा हा सुख सोहळा इतरत्र कुठेही नाही म्हणून तो पाहण्यासाठी वारकरी पंढरीला जात आहे. असा सुख सोहळा स्वर्गी नाही. पंढरीच्या वारीला निघालेला वारकरी फक्त दर्शन घेऊन परत येतो,एवढाच उद्देश त्यामागे नाही, या वारीमध्ये भक्ती बरोबर नैतिकता,आदर,सदाचार, सहिष्णुता, विवेक,चारित्र्य,बंधुभाव, समानता,परोपकार ही जीवनमूल्ये शिकायला मिळतात.कसलाही
धर्मभेद,जातीभेद,वंशभेद लिंगभेद येथे नाही.

स्वार्थीपणा व ढोंगीपणाचा येथे काही फायदा होत नाही. शुद्ध मनाने वारी केली जाते. पंढरीचा पांडुरंग हा साधा भोळा,नवसाला पावणारा, सहज उपलब्ध होणारा, कटेवर हात ठेवून प्रत्येकाचे गा-हाणे ऐकणारा आहे. जळी, स्थळी, पाषाणी तो भरून उरला आहे.म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. *सर्व सुखाचे आगर । बाप रुखुमा देवीवर* संसारात राहुन विठ्ठलाची भक्ती करता येते. त्यामुळे वारकरी शेतीतील पेरणीची कामे आटपून पंढरीच्या वारीला निघाला आहे. दिंडीत वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाका मारतात. येथे वयाचे बंधन नाही, शंभरी उलटून गेली तरी उत्साह कमी झालेला नाही, इतकी ऊर्जा या वारीमध्ये कशी मिळते
हे कधीही न सुटणारे फार मोठे कोडे आहे, म्हणून अनेकांना वारक-यामध्ये पांडुरंग दिसतो. पंढरीचा पांडुरंग हा सर्वांना हास्य वदनाने आनंदी करतो.
भरभरून आशीर्वाद देतो. म्हणून कोणत्याही वारकऱ्याला पंढरीच्या पांडुरंगाची भीती वाटत नाही. कारण त्यांच्या हातात कोणतेही आयुधे नाहीत. म्हणून *बहुत सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी* असे भक्त म्हणतात. परमेश्वराला प्रसन्न करून घ्याचे असेल तर तुम्हाला तीर्थव्रत, जप, तप अजिबात करण्याची गरज नाही. योग, याग, व्रतवैकल्ये या साधनाची बिलकुल आवश्यकता नाही, म्हणून संत सावता महाराज म्हणतात.
*प्रपंची असुनी परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग ।।*
*मोट, नाडा, विहीर दोरी।*
*अवघी व्यापली पंढरी।।*
अशा पद्धतीचे पांडुरंगाचे वर्णन ते अभंगातून करतात. ते विठुरायाला कधीही भेटण्यास पंढरपूरला गेले नाहीत, प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग त्यांना भेटायला आले. ते वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.अध्यात्म आणि भक्ती,आत्मबोध,लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली.अनिष्ट रूढी, प्रथा,परंपरा,अंधश्रद्धा,कर्मटपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भिडभाड ठेवली नाही. पंढरीच्या पांडुरंगा कडे ते काय आळवणी करतात ते आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात पाहायचे आहे
*मागणें ते आम्हा नाहीं हो कोणाशी। आठवावे संतासी हेचि खरें।।1।।*
हे परमेश्वरा तुझ्याकडे आम्ही अशी आळवणी करतो की आम्हाला कोणाजवळही कुठेही, काहीही मागून घ्यायचे नाही,आम्ही कोणाला त्रास देणार नाही,आम्ही कोणापुढे हात पसरणार नाही, फक्त आम्हाला संतांची आठवण यावी ते आमच्या सदैव स्मरणामध्ये कायम राहावेत हीच आमची खरी मागणी परमेश्वराकडे आहे. त्यामुळे आम्हाला त्यांनी भेटावं हीच मनीषा आम्ही बाळगतो. अशी विनवणी संत सावता माळी परमेश्वराकडे मागतात, *पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती। घडावी संगती तयाशींच।।2।।* अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत सावतानी आपण भक्ती करण्यासाठी तयार आहोत, संत हेच परिपूर्ण आहेत, त्यांनी आम्हाला भक्तीचा योग्य मार्ग दाखवावा. तुमच्या सहवासामध्ये आम्ही नेहमी असावं ही आमची मनोकामना आहे.चांगल्या व्यक्तीसोबत राहिल्यानंतर चांगलेच गुण मिळतात.वाईट यासोबत राहिल्या नंतर वाईटच घडते, म्हणून ते येथे म्हणतात.आम्हाला चांगली तुझी संगत घडू दे .या संगतीचा आम्हाला सतत लाभ व्हावा म्हणून ते नित्यनेमाने पंढरपूरला येत जात असत. परमार्थासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही आपल्या मळ्याचा माळी प्रत्यक्ष पांडुरंगच आहे. आपण शेतीत थोडे बी पेरले तर त्याचे कितीतरी पोते धान्य होते. ही विठ्ठलाची कृपा आहे. म्हणून त्यांनी भक्तीचे मळे फुलविले. सात्वीक फुले देवाला वाहिली ,त्याचा सुगंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दरवळला आहे. त्यांच्या मळ्यात कोणत्याही बाजूला गवत उगलेले ते काढून स्वच्छ ठेवत असत. म्हणून त्यांनी अखंड पांडुरंगाचे नामस्मरण करून आषाढी कार्तिकीची वारी ,रात्रीचे भोजन,
नामसप्ताहाच्या पंक्ती ,कीर्तन, प्रवचन या सर्व गोष्टी परमेश्वराच्या सानिध्यात राहण्यासाठी ते करत असत.धार्मिक अंधश्रद्धेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात पशुहत्या,पक्षीहत्या त्यांना मान्य नव्हती .मानवाचा आहार शुद्ध शाकाहारी असावा .असे त्यांना सतत वाटे. देवाच्या नावावर अंगारे -धुपारे करू नये ,असे ते प्रबोधनवादी संत होते.म्हणून ते परमेश्वराकडे एकच मागणी मानतात .की तुमची संगत आम्हाला हवी आहे .संत सावता म्हणे कृपा करी नारायणा. देव तोची जाणा असे मग परमेश्वराला ते म्हणतात. आमच्यावर कृपा कर आम्हाला संतांची भेट घडव. कारण संत हेच आमचे परमेश्वर आहेत. म्हणून परमेश्वराला ते नेहमी मागणे मागतात. तुमची संगत आम्हाला द्या. हीच मागणी त्यांनी केलेली आहे. संत सावता दिवस रा-त्र आपल्या शेतात राब राब राबतात. सारखे पांडुरंगाचे नाम त्यांच्या मुखात असते. ज्या ज्या ठिकाणी सावता रहात असे त्या त्या ठिकाणी त्याला हरीच दिसत असे चला तर सृष्टीमध्ये परमेश्वर भरलेला आहे त्याचे अस्तित्व सर्वत्र पसरलेला आहे काळे आईची ती सेवा करीत होते म्हणून आई त्यांना भरभरून देत होती .त्यांच्या फुललेल्या शेतीकडे पाहून लोक कौतुक करत होते. कांदा मुळा भाजी ।अवघी विठाई माझी असेही सावता महाराज परमेश्वराला विनंती करतात की, आम्हाला संतांची भेट घडून द्यावे, वाईट लोकांसोबत संगत नको म्हणून ते परमेश्वराला मागणी घालतात संताच्या भेटीचा ध्यास त्यांच्या अभंगातून व्यक्त होतो .*सावता म्हणे कृपा करी नारायणा। देव तोचि जाणा असे मग।।3 ।।* अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत हे परमेश्वराचे रूप आहे. म्हणून हे नारायणा, माझ्यावर कृपा कर. आणि मला संताची गाठ घालून दे. असे अभंगातून भक्ताच्या हृदयातील खरा कळवळा ते शब्दात व्यक्त करतात. संत हेच आम्हाला खरा भक्ती मार्ग दाखवतात ०ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो की खरी भक्ती काय असते? हे आम्हाला कळते म्हणून संत संगे सर्वकाळ आम्हाला त्यांची सोबत दे.असे विनवणी ते पांडुरंगाकडे करताना दिसतात. संत सावता हे परमेश्वराला त्यांच्या अंत:करणापासून विनवणी करतात.आम्हाला संतांची भेट घालून दे संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्तिमार्ग दाखवतात संपूर्ण अभंगात त्यांच्या देवाला भेटण्याची तळमळ आपल्याला दिसून येते म्हणून तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंगाकडे फक्त तुझा सहवास आम्हाला दे असे म्हणतात.
आज कालचा तरुण असे काही मागील का असे तुम्हाला वाटते. आजचा तरुण परमेश्वराकडे काय मागत असेल ? हा संशोधनाचा विषय आहे. आजच्या तरुणाकडे संगत चांगली नाही. वाईट संगत आहे.त्यामुळे तो वाया जात आहे. तो रस्त्यावर येत आहे.आणि दुसऱ्याला तो पैसे मागत आहे .
.त्यामध्ये त्याचे समाधान नाही म्हणून तुम्ही परमेश्वराचं सहवास मागा सगळेच तुम्हाला मिळेल अशा शब्दांत संत सावता परमेश्वराला विनवणी करतात. आषाढी वारीच्या सर्व भाविक भक्तांना विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष:विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *