नांदेड- येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे.
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली
भाग्यश्री माधवराव जाधव हिने चीन, दुबई, पोर्तुगाल, मोरक्को, पॅरिस, जपान येथे झालेल्या जागतिक पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट केली आहे. सदर स्पर्धांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याने भारताचा नावलौकिक केला आहे.
बंगळूरू, नवी दिल्ली, गोवा येथे वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांवर आपले नाव कोरत तिने महाराष्ट्राची शान राखली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा व वर्ल्ड चॅम्पियनशिप या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेत चुणूकदार कामगिरी दाखवत तिने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. भाग्यश्री जाधव हिच्या प्रतिभाशाली कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिला शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
जपान मधील टोकियो येथे सन 2021 मध्ये झालेल्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत देखील तिने भारताचे नेतृत्व केले होते. सदर स्पर्धेत तीने जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकाचे स्थान मिळविले होते.
आता पुन्हा सप्टेंबर 2024 मध्ये होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी तिला दुसऱ्यांदा मिळाली आहे. सदरील स्पर्धेच्या निवडीचे पत्र नुकतेच तिला प्राप्त झाले आहे.
भाग्यश्री जाधव हिने प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सि.सत्यनारायण (बंगळूरु), प्रशिक्षक रविंदर सर सहाय्यक प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु), स्ट्रेन्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक मयुर रसाळ व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक स्तरावरील स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्रातील जनतेबरोबरच संपूर्ण देशवासियांच्या सदिच्छा व आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आपण पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचा तिरंगा ध्वज फडकावून दाखऊ असा आत्मविश्वास भाग्यश्री जाधव हिने प्रसार माध्यमांनी बोलताना व्यक्त केला.
+++++++++