नांदेड, दि. ७ जुलै २०२४
मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारने सोमवार, ८ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली असून, माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आयोजित या बैठकीला राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह अनेक नेते व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
उल्लेखनीय बाब म्हणजे खा. अशोकराव चव्हाण आणि खा. सांदिपान भुमरे यांनी दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. एक लोकप्रतिनिधी व समाजाचे नागरिक म्हणून मराठा आरक्षण विषयक प्रश्नांचा आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत राहू, असे ते या भेटीनंतर म्हणाले होते. दरम्यान, सोमवारी आयोजित बैठकीत आपण जरांगे पाटील यांच्यासमवेत झालेल्या चर्चेतील विषयांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी दिली आहे.
***********