अमरनाथ गुहेतून भाग- ३ (*लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर)

 

आजचा संपूर्ण दिवस हा रेल्वेतच जाणार असल्यामुळे निवांत उठण्याचे ठरवले होते. पण दररोजची सवय असल्यामुळे सकाळी पाचच्या आधीच जाग आली. प्रात्यविधी आटोपला. पंधरा ते वीस मिनिटात प्राणायाम केला. तरीदेखील वेळ जात नव्हता. हमसफर एक्सप्रेसच्या बी १३ या शेवटच्या डब्यामध्ये माझा बर्थ होता. बी १ पर्यंत प्रत्येक डब्यात आमचे काही सहप्रवासी होते. बी १ च्यानंतर पेंट्री कार चा डब्बा होता. घड्याळात पाहिले तर साडेपाच वाजले होते. मग मी निर्णय घेतला की, पेंट्री कार मध्ये जाऊन सर्वांसाठी नाष्टा व चहाची ऑर्डर द्यायची. रेल्वेतच मॉर्निंग वॉक सुरू झाला. काही डब्यामध्ये आरएसी असलेले प्रवासी खाली झोपलेले आढळले. त्यांना ओलांडून जात असताना मॉर्निंग वॉक मध्ये अडथळ्याची शर्यत पूर्ण करत असल्यासारखे वाटले. सर्वजण निवांत झोपले होते. अर्धा तास चालत गेल्यानंतर शेवटी पेंट्री कार चा डब्बा आला. तिथे मात्र सर्व कर्मचारी आपापली कामे करण्यात व्यस्त होते. मॅनेजरला उठवले व त्याला सांगितले की, आमच्या नव्वद लोकांना नाश्ता व चहा पाहिजे .पेंट्रीचे खाद्यपदार्थ व चहा विशेष दर्जेदार नसतो. त्यामुळे मॅनेजरला माझे डीआरयुसी चे कार्ड दाखवून अशी तंबी दिली की, तू जर खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला दिला नाही तर मी तुझी कंप्लेंन करेल. ही मात्रा बरोबर लागू झाली. त्याने विश्वास दिला की, तुमचे सर्व पदार्थ वेगळे बनवतो. मी म्हटले तसे चालणार नाही. सर्वांसोबतच आमचा देखील नाश्ता बनव. आम्हाला चांगले व इतर प्रवाशांना वेगळे असे चालणार नाही. सर्वांना दर्जेदार पदार्थ दे. त्याने होकार दिला. कॅन्टीन मध्ये कर्मचारी सकाळचा नाष्टा बनवत होते. पोहे, कटलेट, आलू पराठा, पुरी भाजी असे वेगवेगळे पदार्थ बनवण्यात येत होते. मी सर्वांसाठी पोहे आणि चहाची ऑर्डर दिली. सकाळी आठ वाजता आमच्या सर्व यात्रेकरूंना वाटप कर अशा सूचना देऊन तिथून निघालो. परत बोगी क्रमांक एक ते तेरा अशी पदयात्रा सुरू झाली. यावेळी मात्र आमच्या यात्रेतील बरेच जण उठलेले आढळले. त्यांना जय भोले करत रात्री व्यवस्थित झोप झाली का याची चौकशी केली. माझ्या बर्थ वर जाईपर्यंत साडेसात वाजले होते. बराच टाईमपास झाला होता.

आमच्या या टूरमध्ये जेवणाची व्यवस्था नसते. परंतु बरेच माझे मित्र दरवर्षी जेवण नाश्ता त्यांच्यातर्फे देत असतात. त्यामुळे तेरा दिवसाच्या प्रवासात कधीतरी एखादे जेवण यात्रेकरूंना विकत घ्यावे लागते. गेल्या बावीस वर्षात कुठे ही अडचण आली नव्हती. यावेळी देखील जेव्हा आम्ही नांदेडहून निघत होतो. त्यावेळेस अन्नदात्यांचा सत्कार करत असताना अचानक दोघा तिघांनी नाश्ता देण्यासाठी संमती दिली. त्यापैकीच एक असलेले आमचे पूर्वीचे यात्रेकरू सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक निवृत्तीराव नेवळे पाटील यांनी देखील एक नाश्ता त्यांच्यातर्फे देण्याचे सांगितले होते. त्यांना फोन लावला आणि सांगितले की, आताचा नाश्ता व चहा तुमच्यातर्फे देत आहे. त्यांनी लगेचच संमती दिली. माझ्यासोबत असलेला टूर मॅनेजर संजय राठोड याला पेंट्री कार वाल्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन आपल्या सर्व यात्रेकरूंना नाष्टा व चहा देण्याचे सांगितले. ग्रुपमध्ये मेसेज टाकला की, सर्वांनी आपापल्या गळ्यात आम्ही दिलेले आयकार्ड टाकावे. जेणेकरून प्रत्येकाला ओळखून नाश्ता व चहा देणे सोईस्कर होईल. दर्जेदार भरपूर कांदेपोहे आणि स्पेशल मसाला व आलं घातलेला सुंदर चहाचे वाटप सर्वांना व्यवस्थित झाले. नाश्त्याचा दर्जा पाहून दुपारचे जेवण देखील पेंट्रीवाल्यालाच बनवायला सांगितले.

आमच्या ९० जणांच्या ग्रुप मधील बाहेरगावांच्या यात्रेकरू सोबत चर्चा करताना यात्रेसाठी आमचीच निवड का केली हा प्रश्न विचारला. सर्वांचे एकच म्हणणे पडले की, तुमच्या सोबत पूर्वी आलेले आमचे परिचित, नातेवाईक असलेले यात्रेकरू यांनी तुमच्याबद्दल इतके भरभरून सांगितले की, आम्ही त्याचवेळी निश्चय केला होता की, अमरनाथ ला जेव्हा जायचे असेल तेव्हा नांदेडच्या दिलीपभाऊ ठाकूर यांच्यासोबत जायचे. आत्तापर्यंतचा प्रवास पाहता आमचा निर्णय योग्य असल्याचे आढळून आले. यापुढे आम्ही तुमच्या इतर ठिकाणी जाणाऱ्या सर्व टूर मध्ये सहभागी होणार आहोत. मी म्हटले हा जो तुम्ही निर्णय घेतला आहे तो फार तातडीने घेतला आहे. आपली यात्रा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय ते ठरवा.

उद्यापासून बस चा प्रवास सुरू होणार असल्यामुळे दोन वेगवेगळे ग्रुप केले. डायमंड ग्रुपचे ग्रुप कॅप्टन होते यापूर्वी आमच्या सोबत आलेले बालाजीराव इंगोले व कॅशियर केले नवनाथ सोनवणे यांना. या ग्रुपमध्ये माझ्यासह बालाजी जाधव, रेखा सोनवणे उदगीर, रेखा व सुरेश त्रिमुखे लातूर, सुरेखा रहाटीकर, अंजली कुलकर्णी हैदराबाद, सिंधू वासरे मुखेड, स्नेहाराणी व महेश बिराजदार पुणे, प्रणिता व नंदकुमार कुलकर्णी, महादेवी व आनंद साताळे, सविता व राजू बच्चेवार, सुचिता व व्यंकट वायगावकर, माधुरी व सूर्यकांत सुवर्णकार, अरुणा व प्रफुल नागरगोजे, जयमाला लटपटे गंगाखेड, सारिका केंद्रे,रेखा भताने, प्रिया त्रिमुखे बेंगलुरू, स्वाती व प्रदीप माळेगावे बा-हाळी, कविता व अशोक गरुडकर, मृदुला व बलभीम पत्की, सुमती व शशिकांत कुलकर्णी, सुनिता व अनंत कवठेकर, सुजाता व सुधीर आंबेकर, विनूताई व गणपतसिंग ठाकूर, अपर्णा कुलकर्णी, श्रीहरी कुलकर्णी दिल्ली, श्रीकांत मुखेडकर यांचा समावेश होता.

 

नांदेड येथील प्रतिष्ठित व्यापारी व माझे मित्र सुभाष बंग हे दरवर्षी दिल्ली येथे भोजनाची व्यवस्था करत असतात. दुपारी एक वाजता त्यांच्यातर्फे भोजन देण्यात आले. जेवणानंतर सर्वांना सक्तीने वामकुशी घ्यायला लावली. साडेचारला पूर्वी ठरल्याप्रमाणे गाण्याची मैफिल आमची सुरू झाली. आपले आवडते गाणे जमेल तसे जो तो म्हणत होता. आमच्यापैकी काहीजण खरोखरच दर्जेदार गात होते. माझा गळा तेवढा चांगला नाही पण तरीदेखील टूरमध्ये मी गाण्याची आवड पूर्ण करत असतो. ओ मेरी जोहराजबी, तेरे चेहरे में वो जादू है ही दोन गाणे मी म्हटली. दोन तास चाललेल्या या मैफिलीत अनेक जुने गाणे ऐकताना खुप चांगले वाटले.

सायंकाळी सहा च्या सुमारास लुधियाना स्टेशन आले. दर वेळेस प्रमाणे कुलदीपसिंघ दीपा यांच्या हुजूर साहेब जथ्याने आमचे जल्लोषात स्वागत केले. वीस ते पंचवीस सरदार आमच्या स्वागतासाठी आलेले पाहून सोबतचे यात्रेकरू चकित झाले. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, बम बम भोले चा गजराने संपूर्ण स्टेशन दणाणून गेले होते. आमच्या सर्वांची लंगरची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांचा स्मृतिचिन्ह व सिरोपाव आणि गुरुद्वाराचा प्रसाद देऊन सत्कार केला. आमचा हा सोहळा पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली होती. ट्रेन सुटल्यानंतर त्यांनी दिलेले खाद्य पदार्थ आधी सर्व डब्यातील आमच्या यात्रेकरूंना स्वयंसेवकांनी व्यवस्थित वाटप केले. चविष्ट खीर,छोले भटूरे,पुदिना चटणी इतकी अप्रतिम होती की, सर्वांना खूप आवडली. आमच्या सर्वांना वाटप झाल्यानंतर देखील बरेच शिल्लक राहिले होते. लंगरचा प्रसाद लो भाई म्हणून इतर प्रवाशांना ते वाटप केले. ट्रेन मधील ब्लॅंकेट देणाऱ्या अटेंडंट आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवर्जून जेवण दिले. रात्री साडेअकराला आम्ही जम्मूला पोहोचणार असल्यामुळे सर्वांना सक्तीने झोपायला लावले.
*(क्रमश)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *